चीनकडून होणारी कोट्यवधींची आयात शून्यावर आणणार; भारतीय व्यावसायिकाचा विश्वास

अतीशय महत्त्वाच्या मुद्द्याबाबत हमी देत ते म्हणाले...   

Updated: Jul 5, 2020, 06:21 AM IST
चीनकडून होणारी कोट्यवधींची आयात शून्यावर आणणार; भारतीय व्यावसायिकाचा विश्वास  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : indiavschina भारत India आणि चीन china या दोन्ही राष्ट्रांमध्ये संघर्ष आणखी चिघळताना दिसत असतानाच भारताममध्ये चिनी बनवटीच्या वस्तूंच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचं सत्रही तितक्याच वेगानं सुरु झालं आहे. अनेक ठिकाणी तर, चीनी बनावटीच्या वस्तूंवर जातीनं बंदी घालण्यात आली आहे. यातच आता काही बड्या कंपन्या आणि उद्योजकांनी उडी घेत चिनी बनावटीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी आणत सरकारच्या निर्णयात आपलाही सहभाग नोंदवला आहे. 

जेएसडब्ल्यू या उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनीही नुकतीच अशीच काहीशी भूमिका मांडत चीनची कोंडी करण्यात आपलाही सहभाग नोंदवला. चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या मालाची संख्या ही शून्यावर आणणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला. येत्या दोन वर्षांच्या काळात कोट्यवधींवरून ही उलाढाल आता थेट शून्यावर येणार आहे. त्यामुळं हा चीनला एक मोठा झटका असणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

जिंदाल यांनी त्यांच्या या निर्णयाबाबत आणखी कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. पण, ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सर्वांसमक्ष मांडलेला हा निर्णय अनेक प्रश्न उपस्थित करुन गेला आहे. 'चीनकडून भारतीय भूमीतच भापल्या शूर जवानांवर असा भ्याड हल्ला केला जाणं हा एक धोक्याचा इशारा असून, आताच प्रतिकार करण्याची वेळ असल्याचाही हा इशारा आहे. सध्याच्या घडीला आम्ही जेएसडब्ल्यू समूह चीनकडून जवळपास ४०० मिलियन युएस डॉलर्सच्या मालाची चीनकडून आयात करतो. पण, पुढच्या २४ महिन्यांच्या कालावधीत (दोन वर्षांत) ही संख्या आम्ही शून्यावर आणणार आहोत', असं ट्विट त्यांनी केलं. ते समूहाच्या सिमेंट आणि रंग उद्योग क्षेत्राचे व्यवहार पाहतात. 
जिंदाल यांनी केलेलं हे ट्विट व्यवसाय जगतात अनेकांचं किंबहुना साऱ्या विश्वाचं लक्ष वेधून गेलं. या समूहाशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार सध्या चीनकडून यंत्रांचे विविध भाग, सिमेंट आणि उर्जा व्यवसायाशी संबंधित गोष्टींची आयात केली जाते. त्यामुळं आता ही बहिष्काराची आकडेवारी चीनला नमवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

काही दिवसांपूर्वीच लडाखच्या पूर्व भागात असणाऱ्या Galwan valley गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाली. याचे तीव्र पडसाद दोन्ही देशांच्या नातेसंबंधांवर आले. चीन आणि भारत या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या या संघर्षा दोन्ही देशांच्या सैन्यातील जवावानांचे प्राण पणाला लागले. हा वाद इतका चिघळला की, आरोप प्रत्यारोप आणि चर्चांच्या सत्रांनंतर आता भारताकडून काही कठोर भूमिका घेत चीनची मक्तेदारी मोडण्यासाठीची पावलं मोठ्या निर्धारानं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.