नवी दिल्ली : तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ऑलनाईन तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTCने एक जबरदस्त योजना आणली आहे.
IRCTCच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला IRCTC अकाऊंटवरुन आधार क्रमांक लिंक करणं आवश्यक आहे. असं केल्यानंतर तुम्हाला १०,००० रुपयांचा कॅशबॅक किंवा मोफत तिकीट बुक करण्याची संधी मिळणार आहे. इतकचं नाही तर IRCTC अकाऊंटवरुन आधार लिंक करताच तुम्ही प्रत्येक महिन्याला सहा ऐवजी १२ तिकीट बुक करु शकणार आहात.
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींग आणि IRCTC अकाऊंट असणाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वेने ही योजना सुरु केली आहे. ही स्कीम लकी ड्रॉवर आधारीत आहे.
रेल्वेच्या या लकी ड्रॉ स्कीमचा लाभ प्रत्येक महिन्याला ५ लोकांना मिळणार आहे. लकी ड्रॉ जिंकणाऱ्या केवळ १०,००० रुपयांचं बक्षीस मिळणार नाही तर, तिकीट बुक करण्यासाठी जो खर्च झाला असेल ते पैसेही परत मिळणार आहेत. मात्र, यासाठी IRCTC प्रोफाईलवर जे नाव आहे तेच नाव तुमच्या तिकीटावरही असणं आवश्यक आहे.
लकी ड्रॉमध्ये जिंकणाऱ्यांची माहिती IRCTCच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात येईल. त्यासोबतच विजेत्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरही पाठवण्यात येईल. ही योजना डिसेंबर २०१७ पासून सुरु झाली असून पुढील सहा महिने सुरु राहणार आहे.