नवी दिल्ली: भारतीय वायूदलात प्रशिक्षणासाठी वापरण्यात विमानांच्या खरेदी व्यवहारातून रॉबर्ट वढेरा यांनी कोट्यवधींचा नफा कमावला. यूपीए-१ सरकारच्या काळात अशाप्रकारचे पेट्रोलियम आणि संरक्षण खात्याशी निगडीत व्यवहारांच्या माध्यमातून त्यांना प्रचंड दलाली मिळाली. याच पैशातून त्यांनी लंडनमध्ये तब्बल ८ फ्लॅटस खरेदी केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला. ते बुधवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. रॉबर्ट वढेरा बुधवारी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. यावरूनच सांबित पात्रा यांनी वढेरांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, वढेरा यांनी अनेक कंपन्यांकडून आडमार्गाने पैसा मिळवला. त्यांच्यासारखा 'रोडपती' 'करोडपती' कसा काय झाला, असा सवालही सांबित पात्रा यांनी विचारला.
सेंटेक इंटरनॅशनल नावाची एक कंपनी वढेरा यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या संजय भंडारी यांची आहे. पेट्रोलियम व्यवहारातून मिळालेली दलाली याच कंपन्यांच्या खात्यात गेली. त्याच पैशांमधून लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यात आले. याशिवाय २००९ मध्ये झालेल्या एका करारातून मिळालेला पैसा स्कायलाईट नावाच्या दुबईस्थित कंपनीच्या खात्यात गेला. या कंपनीची मालकी सीपी थंपी यांच्याकडे आहे. थंपी यांची फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे. ही व्यक्ती भंडारी आणि वढेरांसाठी काम करते, असे आरोप सांबित पात्रा यांनी केले.
दरम्यान, आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'ईडी'कडून वढेरांची चौकशी होणार आहे. लंडनमध्ये वढेरा यांची १.९ लक्ष पौंडांची मालमत्ता असल्याचा संशय आहे. त्यामुळे आम्ही वढेरांना केवळ त्यांच्या लंडनमधील मालमत्तेची माहिती देण्यासाठी बोलावल्याचे 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.