साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात झटकले, जाहीर माफी मागण्याचे आदेश

पक्षाने याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

Updated: May 16, 2019, 05:10 PM IST
साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात झटकले, जाहीर माफी मागण्याचे आदेश title=

नवी दिल्ली: नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी भाजपकडून देण्यात आले. आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो. पक्षाने याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी जनतेची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी सांगितले. त्यामुळे आता साध्वी प्रज्ञा यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी नथुराम गोडसे स्वतंत्र भारतामधील पहिला दहशतवादी असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून बराच गदारोळही झाला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांकडून साध्वी प्रज्ञा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि कायम राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वींच्या या वक्तव्यानंतर भाजपला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. टीकेचा जोर वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी या वक्तव्याबद्दल माफीही मागितली होती.