भाजपचा मोठा दाव, अखिलेश यादव यांच्या विरोधात या केंद्रीय मंत्र्याला उमेदवारी

UP Assembly Election 2022 : अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीची चुरस आणखी वाढणार आहे.

Updated: Jan 31, 2022, 04:03 PM IST
भाजपचा मोठा दाव, अखिलेश यादव यांच्या विरोधात या केंद्रीय मंत्र्याला उमेदवारी title=

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे. तशी निवडणुकीची रंगत देखील वाढत चालली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) सध्या अखिलेश यादव यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पण भाजपने देखील निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आज मेनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण यातच भाजपने जोरदार खेळी करत केंद्रीय मंत्र्यांना अखिलेश यादव यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय कायदा राज्य मंत्री एसपी सिंह बघेल (sp singh baghel) यांनी करहल मतदारसंघातून (karhal constituency) अर्ज दाखल केला आहे. अखिलेश यादव यांना ते आव्हान देणार आहे. सध्या एसपी सिंह बघेल आग्रा येथून खासदार देखील आहेत.

करहल येथून केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी उमेदवारी दिल्यानंतर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'करहल मध्ये भाजपच जिंकेल, प्रो एसपी सिंह बघेल जिंकणारच, 2022 मध्ये करहल येथून यादव अखिलेश यांचा पराभव होणार, भाजप जिंकणार, कमळ उमलणार, सुशासन राहणार, विकास होत राहणार'

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मेनपुरीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. मेनपुरीमधून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव हे खासदार आहेत.

करहलमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने ज्ञानवती यादव यांना तर बसपाने कुलदीप नारायण यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.