नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सुल्तानपुर येथून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रतिनिधीत्व करत असलेले खासदार वरूण गांधी यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचे दुख: बरेच जिव्हारी लागले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नसल्याने त्यांची नाराजी अधूनमधून ते विविध मार्गाने बोलून दाखवतात. दरम्यान, सुल्तानपुर येथील जयसिंह विधानसभा मतदारसंघातील सेमरी बाजार येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या वेळी मीसुद्दा बाबाच व्हायला हवे होते, असे म्हटले.
वरूण गांधी म्हणाले, जीवन गंगेप्रमाणे आहे. आपण तिच्यात जितके उतरू तितके आपल्याला स्वच्छ आणि पवित्र वाटते. जीवन कोणत्याही घराला किंवा दुकानाला म्हणत नाहीत. जीवन हे मनात असते. तुम्ही जितके लोकांच्या हृदयात जाल तितके तुम्हाला जाणवत राहते की, होय आपलीही कमाई झाली आहे. मला वाटते की, मीसुद्धा बाबाच व्हायला हवे होते.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यासी संबंधीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वरूण म्हणाले, मी राजकारणात लोकांची सेवा करण्यासाठी आहे. लोकांना खाली खेचायला, अपमानीत करायला किंवा त्यांना संकटात टाकायल नाही. मी गेली चार वर्षे खासदार आहे. पण, लोकांनी मला कधी वाईट म्हटले आहे? या प्रश्नावर लोकांनी एकसुरात नाही असे म्हटले. या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एका अध्यत्मिक बाबांसोबत सेल्फीही घेतली.
दरम्यान, वरूण गांधी हे भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचे सांगितले जाते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वरूण गांधी यांचेही नाव होते. पण, पक्षाने वरूण गांधी यांच्या ऐवजी योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास दाखवला. वरूण गांधी यांनी सुल्तानपूरमध्ये केलेले भाषण हे योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा आहे.