'जीडीपी म्हणजे रामायण किंवा बायबल नव्हे; भविष्याच्यादृष्टीने बिनकामाची संकल्पना'

१९३४ पूर्वी जीडीपी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.

Updated: Dec 2, 2019, 11:54 PM IST
'जीडीपी म्हणजे रामायण किंवा बायबल नव्हे; भविष्याच्यादृष्टीने बिनकामाची संकल्पना' title=

नवी दिल्ली: सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ही संकल्पना म्हणजे रामायण किंवा बायबल नव्हे. भविष्यात जीडीपी ही बिनकामाची गोष्ट ठरेल, अशी मुक्ताफळे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उधळली आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. ही गेल्या सहा वर्षांतील निचांकी कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षातील नेत्यांनी अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. 

मात्र, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविण्यात जीडीपीचे फार महत्त्व नाही. १९३४ पूर्वी जीडीपी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे जीडीपी म्हणजे रामायण, महाभारत किंवा बायबल आहे, असे मानण्याची गरज नाही. भविष्यात ही संकल्पना बिनकामाची ठरेल, असे दुबे यांनी सांगितले. 

'भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था गंभीर; लहानसहान उपायांनी काहीही होणार नाही'

तसेच केवळ जीडीपीच्याआधारे अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यापेक्षा शाश्वत विकासाला प्राधान्य द्यावे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान आणि आयुषमान भारत यासारख्या योजनांमुळे लोकांचे जीवनमान सुधारत असल्याचा दावाही यावेळी निशिकांत दुबे यांनी केला. 

राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेविषयीच्या चिंतेत भर पडली आहे. या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.५ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. भारतीय अर्थव्यवस्थेची ही गेल्या सहा वर्षांतील निच्चांकी कामगिरी आहे. यापूर्वी मार्च २०१३ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ४.३ टक्के इतका नोंदवण्यात आला होता.