लखनऊ : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एसआयटीने शाहजहांपूर येथून त्यांना अटक केली. माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चिन्मयानंद यांनी कायद्याचा अभ्यास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केला आहे, असा आरोप पीडित विद्यार्थीनीने केला होता. त्यानंतर तिचा वडिलांनी नोंदवलेल्या लैंगिक छळ आणि बलात्कारच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर एका विद्यार्थीनीने बलात्काराचा आरोप केला होता. या लैंगिक अत्याचाराचा आरोप असणारे स्वामी चिन्मयानंद यांची प्रकृती बिघडल्यानंतर बुधवारी त्यांना शाहजहांपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिन्मयानंद (७३) यांच्यावर मुमुक्षु आश्रमात डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. या ठिकाणी त्यांना १ सप्टेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
दरम्यान, एसआयटीच्या तपासावर अनेक दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. साक्षीबाबतचे सर्व पुरावे असूनही आरोपी स्वामी चिन्मयानंदना अटक करण्यात येत नव्हती. दोन दिवसांपूर्वी पीडितेचा न्यायालयात कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला होता. त्यावेळी चिन्मयानंद यांना कधीही अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता होती. न्यायालयात पीडितेचे जबाब नोंदताच आरोपी चिन्मयानंद कथित आजारपणा दाखवून रुग्णालयात दाखल झाले होते.
स्वामी यांच्यावर त्यांच्याच महाविद्यालयात शिकणार्या कायद्याच्या विद्यार्थ्याने बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दोन-सदस्यीय विशेष खंडपीठ स्थापन केले होते आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.