रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राज्यात नगरपंचायत निवडणूक निकालात सत्तेत असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत भाजप ३८४ जागांसह पहिल्या क्रमांकावर, तर २८४ जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेवर आत्मपरिक्षण करण्याची गरज असून शिवसेनेकडे डायलॉगपुरतं हिंदुत्त्व उरलं आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
शिवसेनेला आत्मचिंतनाची गरज
पंचायतीच्या निवडणुकीत पंचायत शिवसेनेची झाली आहे, त्यांचे मुख्यमंत्री असताना ते चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. पंचायती निवडणुकीचं विश्लेषण केलं तर महाविकास आघाडी सरकार आल्यापासून जेवढ्या निवडणुका झाल्या, ग्रामपंचायत असो, पोटनिवडणुका असो सर्वच निवडणुकीत एक नंबरचा पक्ष भाजप ठरला आहे. याचा अर्थ असा आहे की भाजप आणि पंतप्रधान मोदींवर महाराष्ट्रातील जनतेचा आजही विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
'शिवसेनेचं हिंदुत्व डायलॉगपुरतं'
शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेनेच्या भरवश्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वत:चा व्होटबँक तयार करत आहेत. शिवसेनेला आणखी खालीखाली जावं लागत आहे. शिवसेनेच्या आमदारांची काम होत नाहीत, पण राष्ट्रवादीच्या पडलेल्या आमदाराची कामं होत आहेत.
शिवसेनेचं हिंदुत्त्व हरवलं आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व शिवसेनेत शिल्लक राहिलेलं नाही, हिंदुत्त्वाचं तत्त्व शिवसेना आता वाचवू शकेल असं वाटत नाही, कारण शिवसेनेकेडे आता फक्त डायलॉगपुरतं हिंदुत्त्व आहे, डायलॉगबाजीने हिंदुत्व सिद्ध करता येत नाही, अशी जोरदार टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ओबीसी फॅक्टर किती महत्त्वाचा
ओबीसी हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच, भारतीय जनता पक्षाचा बेस ओबीसी आहे. तीन पक्षांनी मिळून ओबीसींचा विश्वासघात केला, तो जनतेसमोर उघड झाला. दोन वर्ष केंद्र सरकारकडे बोट दाखवलं आणि काल त्यांचे वकिल सर्वोच्च न्यायालयात म्हणतात आमच्याकडे डेटा आहे, हा खेळ जो त्यांनी केला आहे, त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज भाजपाच्या पाठिशी आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य मागास वर्गीय आरक्षणाने जे सर्वेक्षण केलं होतं, त्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाचा डेटाही गोळा केला होता. हा कदाचित तो डेटा असू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने तो डेटा नाकारलेला नाहीए.
कर्जतमध्ये लोकशाहीची हत्या
कर्जतमध्ये ज्याप्रकारे लोकशाहीची हत्या करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, आमचे फॉर्म भरलेले उमेदवार वेगवेगळ्या दबावाखाली आणून त्यांना फॉर्म परत घ्यायला लावले. असं असलं तरी भविष्यात तिथली जनता राम शिंदे यांच्या मागेच उभी राहिल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.