अमित शहांच्या टीममधल्या या ३ नेत्यांनी ममता दीदींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला

पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशामागे या ३ नेत्यांची मेहनत

Updated: May 28, 2019, 07:34 PM IST
अमित शहांच्या टीममधल्या या ३ नेत्यांनी ममता दीदींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला title=

नवी दिल्ली : मोदींचा चेहरा, अमित शाह यांची रणनीती आणि ३ नेत्यांची मेहनत यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास रचला. २०१४ मध्ये फक्त २ जागा मिळालेल्या भाजपला २०१९ मध्ये ममतांच्या बालेकिल्ल्यात १८ जागा मिळाल्या आणि सगळं गणितच बदललं. पण हे इतकं सोपं पण नव्हतं. पश्चिम बंगालमध्ये तीन नेत्यांच्या मेहनतीमुळे भाजपला हे यश मिळालं. ते म्हणजे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष.

कैलाश विजयवर्गीय

पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी अमित शाह यांनी कैलाश विजयवर्गीय यांना पुढे केलं. विजयवर्गीय यांची ओळख ही एक आक्रमक नेता म्हणून आहे. २०१५ मध्ये कैलाश विजयवर्गीय यांनी जबाबादारी घेतल्यानंतर आधी राज्यातील हिंसेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जावून भेट घेणे सुरु केलं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील पक्षाबाबत विश्वास तयार झाला. संगठनेत मोठा बदल झाला आणि उत्साह संचारला.

विजयवर्गीय यांनी कार्यकर्त्यांमधला टीएमसीबद्दलची भीती कमी केली. त्यांनी जबरदस्त जनसंपर्क तयार केला. एका वर्षानंतर जेव्हा 2016 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजपला ३ जागा मिळाल्या. त्यानंतर त्यांनी पक्षाचा विस्तार केला. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. पुढे जावून मुकूल रॉय यांच्या सारखा नेता त्यांना मिळाला.

मुकुल रॉय

मुकुल रॉय हे ममता बॅनर्जींचे जवळचे नेते मानले जायचे. मुकुल रॉय हे तृणमुल काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. तृणमूल काँग्रेस आज पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. त्यामध्ये मुकुल रॉय यांचा मोठा वाटा आहे. १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत तृणमुल काँग्रेसची स्थापना केली होती. 

२०११ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रीपद सोडत मुख्यमंत्रीपद घेतलं. तेव्हा त्यांनी मुकुल रॉय यांना रेल्वेमंत्री केलं. पण काही मतभेदामुळे २५ सप्टेंबर २०१७ ला मुकुल रॉय यांनी पक्ष सोडला. त्यानंतर भाजपने त्यांना पक्षात घेतलं.

अमित शाह आणि कैलाश विजयवर्गीय यांनी मुकुल रॉय यांच्यासोबत मास्टर प्लॉन तयार केला. त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी इलेक्शन कमेटीचा इंचार्ज बनवण्यात आलं. पश्चिम बंगालमधील प्रत्येक जागेचा प्लान त्यांनी तयार केला. हजारो कार्यकर्ते त्यांनी जोडले.

दिलीप घोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या यशामागे असलेलं तिसरं नाव म्हणजे दिलीप घोष. आधी ते आरएसएसचे प्रचारक होते. दिलीप घोष आज पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष आहेत. संघाचे प्रमुख असलेले केएस सुदर्शन यांचे जवळचे असलेले दिलीप घोष यांना कैलाश विजयर्गीय यांनीच ओळखलं होतं. दिलीप घोष यांना अध्यक्ष बनवण्यासाठी विजयवर्गीय यांनीच  अमित शहा यांना सांगितलं होतं. २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत खडगपूर मतदारसंघातून ज्ञान सिंह सोहनपाल यांचा पराभव केल्यानंतर ते अधिक चर्चेत आले. कारण १९८२ पासून सोहनपाल येथे विजयी होत होते. वकील असलेले ५४ वर्षीय दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं.