मुंबई : गुजरातमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपबरोबरच काँग्रेसनंही प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचा गड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहुल गांधींनी वादळी प्रचार करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींबरोबरच पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनीही भाजपविरोधात प्रचार केला.
सगळीकडून विरोधकांनी खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी पुन्हा एकदा गुजरातमध्ये कमळ फुलण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीआधी लोकनिती आणि सीएसडीएस या संस्थांनी ओपिनियन पोल घेतला आहे.
या ओपिनियन पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला ११३ ते १२१ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेसला ५८ ते ६४ जागांवर यश मिळेल आणि १ ते ७ अपक्ष उमेदवार निवडून येतील, असा अंदाज आहे. गुजरातमध्ये भाजपची पुन्हा एकदा सत्ता येण्याचा अंदाज असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे, असं सीएसडीएस आणि लोकनितीचा ओपिनियन पोल सांगतो.
२०१२ साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये १८२ जागांपैकी भाजपला ११६, काँग्रेसला ६०, गुजरात परिवर्तन पक्षाला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.