भ्रष्टाचाराचा कहर, पठ्ठ्याने रेल्वे शेडमधलं इंजीनच विकलं

बिहारमध्ये रेल्वेमधील भ्रष्टाचाराचं अजब प्रकरण समोर आलं आहे

Updated: Dec 20, 2021, 10:27 PM IST
भ्रष्टाचाराचा कहर, पठ्ठ्याने रेल्वे शेडमधलं इंजीनच विकलं title=

समस्तीपूर : बिहारमध्ये (Bihar) भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील समस्तीपूरमध्ये (Samastipur) भामट्यांनी फसवणुकीच्या सर्व मर्यादा ओलांडत चक्क ट्रेनचं इंजिनच (Train Engine) विकलं. या संपूर्ण घोटाळ्यात समस्तीपूर रेल्वे विभागातीलच एका अभियंत्याची मुख्य भूमिका आहे. बनावट कागदपत्रे तयार करून रेल्वेचे लोकोमोटिव्ह इंजिन विकल्याचा आरोप या अभियंत्यावर आहे.

स्थानकातील इतर कर्मचाऱ्यांचाही साथ
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समस्तीपूर लोको डिझेल शेडचे रेल्वे कर्मचारी राजीव रंजन झा याने पूर्णिया कोर्ट स्टेशन यार्डमध्ये उभं असलेलं जुनं वाफेचं इंजिन परस्पर विकलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभियंत्याने सुरक्षा रक्षक आणि स्थानकातील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

दोन दिवसांनंतर घोटाळा उघडकीस 
आरोपींनी अतिशय सुनियोजितपणे हा कट रचला होता. आरोपी अभियंत्याने बनावट कागदपत्र तयार केली त्यानंतर 14 डिसेंबरला त्याने रेल्वे इंजिनची विक्री केली. घटनेच्या दोन दिवसांनंतर हा घोटाळा उघडकीस आला. 19 डिसेंबरला पूर्णिया कोर्ट स्थानकाचे प्रभारी एमएम रहमान यांनी आरपीएफ ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणात एकूण सात जणांची नावं आहेत.

असा रचला कट
14 डिसेंबरला आरोपी अभियंत्याने गॅस कटरच्या मदतीने इंजिन वेगळे केलं. यासाठी त्याला सुशील नावाच्या मदतनीसाने मदत केली. यानंतर आरोपीने तिथे नियुक्त असणारे प्रभारी एम एम रहमान यांना खोटं पत्र दाखवून इंजिन भंगारात काढण्यात आल्याचं सांगितलं. तसंच त्याचे भाग डिझेल शेडमध्ये पोहचवायचे असल्याचं सांगितलं. 

दुसऱ्या दिवशी देखरेख करणाऱ्या दुसऱ्या प्रभारीने रजिस्टरमधील नोंदी तपासल्या. इंजिनचं असं कोणतंही भंगार डिझेल शेडमध्ये पोहचले नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यासंदर्भातील माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. तपासात डीएमआयने इंजिन भंगारात काढण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट झालं

आरोपी इंजिनिअर फरार
खोटा आदेश दाखवून इंजिन विकणाऱ्या आरोपी इंजिनिअरचा शोध घेतला जात आहे. तसंच डीआरएम यांनी एक हेल्पर आणि एका सुरक्षा कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.