बेगूसाय: घरी लग्नाची तयारी सुरू होती. सगळेजण आनंदात होते. महिन्याभरात लाडकी बहिणी सासरी जाणार याचा आनंद होता. तर बहीण मात्र भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. लग्नासाठी तो नक्की येईल अशी तिला वेडी आशा होती. मात्र भाऊ लग्नासाठी येण्याआधीच वाईट बातमी कुटुंबियांना मिळाली. कुटुंबियांचा धीर सुटला आणि अश्रूंना बांध फुटला.
बहिणीचे हात पिवळे होता होता राहिले आणि कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला. अवघ्या 24 वर्षांच्या ऋषी रंजन उर्फ ऋषी कुमार यांच्या निधनाची बातमी आली. लेफ्टिनेंट ऋषी कुमार यांचं शनिवारी जम्मू-काश्मीर इथे झालेल्या भूसुरूंग स्फोटात निधन झालं.
ऋषी यांचे वडील राजीव हे मूळचे लखीसराय जिल्ह्यातील पिपरिया येथील रहिवासी होते. 40-45 वर्षांपासून ते बेगुसराय येथे घर बांधून राहत होते. त्यांचे वडील फर्निचरचा व्यवसाय करतात. मोठी बहीण आणि मेहुणे दोघेही सैन्यात आहेत आणि आसाममध्ये तैनात आहेत. याची माहिती कुटुंबीयांना मिळताच एकच खळबळ उडाली.
पुढच्या महिन्यात बहिणीचं लग्न होणार होतं. बहिणीच्या लग्नासाठी ऋषी आपल्या घरी येणार होते. त्यासाठी बहिणी देखील खूप आनंदात होती. मात्र लग्नाआधीच ऋषी यांचं जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या स्फोटात निधन झालं. या निधानाची बातमी कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. ऋषी यांच्यावर लष्करी इतमामात आंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यदर्शनासाठी अख्खं गाव जमलं होतं. साश्रू नयनांनी ऋषी कुमार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.