Bihar Politics Nitish Kumar: बिहारमधील राजकीय घडामोडींना मागील काही दिवसांपासून जोर आलेला असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुढील 24 तासांमध्ये बिहारच्या राजकारणासाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजीनामा देऊ शकतात. नितीश कुमार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन करु शकतात. 28 जानेवारीला नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपाचे सुशील मोदी शपथ घेऊ शकतात. तसेच भाजपाला 2 उपमुख्यमंत्री पदंही ऑफर केली जाण्याची दाट शक्यता सूत्रांच्या हवाल्याने व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार पाटण्यामधील मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर स्वातंत्र्य दिनानिमित्त चक्क जिलेबी वाटताना दिसले. राजकीय घडामोडींच्या गर्दीत नितीश कुमार यांचे हे जीलेबी वाटप चर्चेत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू-भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदी यांचं नाव जवळपास निश्चित आहे. मात्र भाजपाला 2 उपमुख्यमंत्री पदं दिली जातील असंही म्हटलं जात आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकाच वेळेस घेतली जाणार असल्याची शक्यता असल्याच्या शक्यतेवर भाजपाच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेबरोबर बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार नाही. आज दुपारी नितीश कुमार राज्यपाल रांजेंद्र अरलेकर यांची भेट घेणार आहेत. जेडीयूच्या सर्व आमदारांना पाटण्यात येण्याचे निर्देश दिले आहेत.
बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा उलथापालथ होणार हे निश्चित मानलं जात आहे. भाजपाबरोबर जाण्याच्या जेडीयूच्या भूमिकेबद्दल पक्षाकडून उघडपणे भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. पाटण्यामध्ये सुरु अशलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बिहारमधील भाजपा नेत्यांबरोबर बैठक घेतली आहे. दिल्लीमध्ये ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी झाली. शाह यांच्या निवासस्थानावरील बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाचाही समावेश होता. जवळपास पावणे दोन तास ही बैठक सुरु होती.
बैठकीमध्ये बाजपाचे बिहारमधील प्रभारी विनोद तावडे, बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, बिहार प्रदेश संघटना महाचिव भूखूभाई दलसानिया, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्याबरोबरच अन्य नेतेही उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतर कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ही बैठक लोकसभेच्या तयारीसंदर्भात असल्याचं भाजपाच्या काही नेत्यांनी सांगितलं अशलं तरी आज सकाळीच भाजपाच्या सर्व आमदारांना पाटण्यामध्ये बोलावण्यात आल्याने राजकीय खलबत सुरु असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर पुन्हा सरकार स्थापन करणार का यासंदर्भात विचारलं असता, 'आधी बैठक तर होऊ दे' अशी प्रतिक्रिया नोंदवली. यावरुन भाजपा आणि जेडीयू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भातील चर्चा या बैठकीत नक्कीच झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.