'सरकारी नोकर आहे, तुमची नाही,' महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले 'तुझी आता...'

सोशल मीडियावर बिहारमधील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. याचं कारण महिला अधिकाऱ्याने थेट दंडाधिकाऱ्यांनाच पाणी देण्यास नकार देत आपण सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही अशा शब्दांत सुनावलं.   

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2023, 01:48 PM IST
'सरकारी नोकर आहे, तुमची नाही,' महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले 'तुझी आता...' title=

सोशल मीडियावर बिहारच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल थेट दंडाधिकाऱ्यांशी भिडताना दिसत आहे. आपण 'सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही' अशा शब्दांत महिला पोलीस कॉन्स्टेबलने दंडाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. हा सर्व प्रकार पाणी मागण्यावरुन झाला आहे. तिथे उपस्थित व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला असून, तो व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल, 'आम्ही सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही. मग तुमचं काम कशाला करु,' असं बोलताना दिसत आहे. झालं असं की, दंडाधिकाऱ्यांनी महिला कॉन्स्टेबलकडे पाण्याची बाटली मागितली होती. पण महिला कॉन्स्टेबलने आम्ही तुमची खासगी कामं करणार नाही सांगत आणण्यास नकार दिला. यानंतर दंडाधिकाऱ्यांनीही महिला कॉन्स्टेबलला कारवाईची धमकी दिली आहे. 

पाणी मागितल्याने संतापली कॉन्स्टेबल

पण कॉन्स्टेबल इतकी का संतापली असा विचार तुम्ही करत असाल तर त्यामागे एक खदखद होती. झालं असं की, दंडाधिकाऱ्यांसोबत असणारे हे पोलीस कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रमात आले  होते. दंडाधिकाऱ्यांनी येथे आल्यानंतर पोटभरुन नाश्ता केला, पण पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था केली नाही. सकाळपासून उपाशी पोटी असल्याने महिला पोलीस कर्मचारी संतापली होती. त्यातच जेव्हा दंडाधिकाऱ्यांनी पाण्याची बाटली मागितली तेव्हा तो सगळा राग व्यक्त झाला. 

दंडाधिकाऱ्यांनी पाणी मागताच संतापलेली महिला कॉन्स्टेबल म्हणाली की, "आम्ही सरकारी नोकर आहोत. सरकारचं काम करु, पण कोणाचेही खासगी नोकर नसल्याने त्यांचं काम करणार नाही". यावेळी तिचे सहकारीही नाराज असल्याचं दिसत होतं. आम्ही सकाळपासून उपाशी पोटी उभे असल्याचं ते सांगत होते.

व्हायरल व्हिडीओत महिला कॉन्स्टेबल पुढे सांगत आहे की, "साहेबांनी तर नाश्ता, पाणी केलं, पण सोबत आलेल्यांना विसरुन गेले". महिला कॉन्स्टेबलने पाणी आणण्यास नकार दिला असता तिचे इतर सहकारीही समर्थन करत होते. 

डीवायएसपींकडे तक्रार करणार - दंडाधिकारी

दंडाधिकाऱ्यांना नेमकं काय झालं असं विचारलं असता ते म्हणाले की, "मी तिच्याकडे पाणी मागितलं असता तिने देण्यास नकार दिला. चार दिवसांपासून ड्युटी करत आहेत. इथे पाण्याची व्यवस्था नाही. मी घऱातून बाटल्या घेऊन येत होतो आणि स्वत: प्यायल्यानंतर त्यांना देत होतो. मी डीवायएसपींकडे यांची तक्रार करणार आहे".