Patna floods: पूरात अडकलेल्या उपमुख्यमंत्र्यांची एनडीआरएफकडून सुटका

बालिया येथील कारागृहातही पाणी शिरल्याने तब्बल ५०० कैद्यांना इतर तुरुंगात हलवण्यात आले आहे.

Updated: Sep 30, 2019, 04:17 PM IST
Patna floods: पूरात अडकलेल्या उपमुख्यमंत्र्यांची एनडीआरएफकडून सुटका title=

पाटणा: गेल्या ४८ तासांपासून बिहारमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण्यात पूरस्थिती उद्भवली आहे. बिहारमधील तीन जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे केवळ सामान्य जनताच नव्हे तर उपमुख्यमंत्रीही संकटात सापडल्याचे दिसून आले. 

पाटणा शहरात सध्या अनेक ठिकाणी चार ते सहा फुटांपर्यंत पाणी साठले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे आपल्या निवासस्थानी अडकून पडले होते. अखेर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) त्याठिकाणी धाव घेत सुशील मोदी यांची सुटका केली. सुशील मोदी यांना एनडीआरएफच्या बोटीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. 

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १९७५ नंतर पाटणा शहरात पहिल्यांदाच इतका पाऊस पडला. त्यामुळे याठिकाणी गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पूरात अडकलेल्या लोकांसाठी हेलिकॉप्टरमधून धान्य आणि औषधाची पाकिटे खाली टाकली जात आहेत. तसेच शहरातील सखल भागांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

पाटण्यातील नालंदा वैद्यकीय रुग्णालयातही पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. बालिया येथील कारागृहातही पाणी शिरल्याने तब्बल ५०० कैद्यांना इतर तुरुंगात हलवण्यात आले आहे. याशिवाय पुरामुळे पाटण्यात येणाऱ्या ट्रेन आणि विमानेही रद्द करावी लागली आहेत.