मित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा

Bihar Crime : बिहारमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम फोटोवरुन त्याच्या जवळच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 30, 2023, 10:10 AM IST
मित्राचा मेहुणीसोबत लिपलॉकचा फोटो पाहून संतापला तरुण; वाढदिवसाच्या दिवशीच काढला काटा title=

Crime News : बिहारच्या (Bihar Crime) मुंगेरमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर मेव्हणीचा मित्रासोबत फोटो पाहून संतापलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपीने त्याच्या मित्राचा आणि मेहुणीचा लिपलॉक असलेला फोटो इंस्टाग्रामवर (Instgaram) पाहून संतापून त्याला संपवलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीत बोलवून आरोपीने मित्रावर गोळी झाडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मेहुणीसोबतच्या संबंधाची कुणकुण लागल्याने मित्राची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. बिहार पोलीस (Bihar Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मृत तरुणाचे नाव विपुल असून त्याचा नुकताच प्रेमविवाह झाला होता. इन्स्टाग्रामवर मृत तरुणाचा मेहुणीसोबतचा फोटो पाहून आरोपी भडकला आणि त्याने गोळी झाडून मित्राचीच हत्या केली आहे.

एसपी जगुनाथरेड्डी जालारेड्डी यांनी सांगितले की, 27 ऑगस्टच्या रात्री जमालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्रमांक-1 शाळेतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात विपुलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विपुलचे वडील राजू मंडल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जमालपूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाताली पाच गुन्हेगारांना अटक केली.

साजन कुमार, शंकर पासवान, विक्की कुमार,साजिद, पवन मंडल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल हा आरोपी साजन कुमारचा मित्र असल्याने त्याच्या नौवागढी भागातील सासरच्या घरी जात असे. विपुलचे साजनसोबत त्याच्या सासरच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. त्याचवेळी साजनची मेहुणी आणि विपुल यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले.

अशातच विपुलने साजनच्या मेव्हणीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तो फोटो पाहून साजन चांगलांच संतापला आणि त्यान विपुलला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार साजनने सर्व मित्रांना सौरभ आणि प्रियांशूच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलवलं. वाढदिवसाच्या पार्टीनंतर सर्वजण मद्यपान करण्यासाठी एका ठिकाणी गेले. त्यावेळी विपुल दारूच्या नशेत असताना साजन कुमारने त्याला पकडले आणि पवन मंडलने त्याच्या कपाळावर पिस्तुलाने गोळी झाडली. गोळी लागताच विपुल जागीच ठार झाला.