चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे

चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे या मोहिमेत सापडले आहेत. हे चांद्रयान 3 मोहितील मोठे यश मानले जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 29, 2023, 09:06 PM IST
चांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे title=

Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान 3 ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. 

चांद्रयान 3 मोहिमेतील  मोठे यश

चांद्रयान 3 चा प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत आहे. प्रज्ञान रोव्हरने संशोधना दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (S ) असल्याची पृष्टी केली आहे. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) अर्थात साधन मोजमाप पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर विविध खनिजांचा शोध घेतला जात आहे. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) च्या असल्याची पुष्टी रोव्हरने केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध मात्र अद्याप सुरु आहे. 

LIBS पेलोडच्या संशोधनाला मिळाले मोठे यश 

लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) अर्थात साधन मोजमाप पेलोड हे ISRO, बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे.  LIBS उपकरणाने दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेवर प्रथमच इन-सीटू मोजमाप केले आहे. इन-सीटू मोजमाप प्रक्रियेत चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (AS) असल्याची पुष्टी करण्यात आलेय.  लेझरच्या मदतीने चंद्रावरील खडक तसेच मातीमध्ये ब्लास्ट करुन त्याचे परिक्षण करण्यात आले. चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) ची उपस्थिती उलगडली आहे. पुढील मोजमापांनी मॅंगनीज (Mn), सिलिकॉन (Si) आणि ऑक्सिजन (O) असल्याचे पुरावे या संशोधनातून मिळाले आहेत. हायड्रोजनच्या अस्तित्वाबाबत अजून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. 

चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान किती?

चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण पाठवलंय.. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवतीच्या मातीचं तापमान प्रोफाइलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.. चंद्राच्या पृष्ठभागावर तापमान सुमारे 50 अंश सेल्सिअस आहे.. मात्र जसं पृष्ठभागापासून खोलवर जातो तसा तापमानात बदल होतो. चंद्राच्या पृष्ठभागाच्या 8 सेंटीमीटर खोलीवर तापमान उणे 10 अंश सेल्सिअस आहे.