वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच धाकट्या भावाने केली थोरल्याची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Bihar Crime : बिहारमध्ये धाकट्या भावाने थोरल्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 5, 2023, 07:45 AM IST
वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच धाकट्या भावाने केली थोरल्याची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण title=

Crime News : बिहारमध्ये (Bihar Crime) लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं आहे. या घटनेमुळे बिहारच्या गोपालगंजमध्ये (Gopalganj) खळबळ उडाली आहे. आरोपी भावाने कुदळीने मोठ्या भावाची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला (Bihar Police) अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

बिहारच्या गोपालगंजमधील बंजरिया गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका घरात वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरू होती. तर दुसरीकडे पैशातून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची कुदळीने हत्या करुन टाकली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. मात्र घरातच घडलेल्या या हत्याकांडाने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पैशांसाठी मोठ्या भावाची हत्या

बंजारिया गावात रविवारी संध्याकाळी वडिलांच्या श्राद्धाची तयारी करत असलेल्या अश्विनी वीरेंद्र पांडे याला त्याच्या लहान भावाने कुदळीने वार केले. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी गोरखपूरला नेले असता त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी आदित्य पांडे याला अटक केली. मुलाच्या हत्येनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पांडे कुटुंबीयांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हादरून गेले. लहान भाऊ पैशासाठी असे काही करेल यावर गावकऱ्यांनाही विश्वास बसला नाही. 

हिशेब करत असतनाच डोक्यात घातली कुदळ

बंजारिया गावातील वीरेंद्र पांडे यांच्या मृत्यूनंतरच्या सातव्या दिवशी मृत अश्विनी पांडे दारात बसून वडिलांच्या श्राद्धविधीच्या खर्चाचा तपशील तयार करत होता. त्यावेळी लहान भाऊ आदित्य याने अश्विनीच्या डोक्यात हातातील धारदार कुदळीने वार केले. त्यानंतर आरडाओरडा ऐकून घरातील लोक तिथे जमा झाले. तितक्यात आदित्य तिथून पळून गेला. कुटुंबीयांनी गंभीर जखमी अश्विनीला तातडीने उपचारासाठी गोरखपूर मेडिकल कॉलेजला हलवले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला.

वडिलांचीही केली हत्या

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्यचे वडील वीरेंद्र पांडे यांच्याशी आठवडाभरापूर्वी संपत्तीवरुन भांडण झाले होते. यानंतर आदित्यने वीरेंद्र यांचा गळा आवळून त्यांना भिंतीवर ढकलले. यामध्येच वीरेंद्र पांडे यांचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हे बाहेर येऊ दिले नाही आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच अश्विनी पांडे कुटुंबासह घरी पोहोचला. त्यानंतर अश्विनी पांडे बाहेर बसून वडिलांच्या श्राद्धविधीच्या खर्चाची यादी तयार करत होता. त्याचवेळी आदित्यने त्याच्यावर कुदळीने हल्ला केला.