नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख

बिहारमधील जात आधारित जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 7, 2023, 07:47 PM IST
नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख title=

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी विधानसभेत आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर आरक्षणाची व्याप्ती 65 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याशिवाय 10 टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना दिलं जाणार आहे. म्हणजेच एकूण 75 टक्के आरक्षण दिलं जाईल. 

विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश यांनी बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 50 वरून 65 करण्याचा प्रस्ताव मांडला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या 10 टक्केचा समावेश करून आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेदरम्यान नितीश  कुमार म्हणाले की, आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. या अधिवेशनातच बदल अंमलात आणायचे आहेत.

नेमका काय प्रस्ताव आहे?

- सध्या SC साठी 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के केले जाणार आहे.
- एसटी 1 टक्‍क्‍यांवरून 2 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार
- ईबीसी (अत्यंत मागास) आणि ओबीसी यांना मिळून 43 टक्के आरक्षण दिले जाईल.
- 10 टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना दिलं जाईल. 

सभागृहाला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रस्तावित आरक्षणाबाबत सांगितले की, अनुसूचित जाती 20 टक्के, अनुसूचित जमाती 2 टक्के, ओबीसी आणि अत्यंत मागास 43 टक्के सोबत EWS साठी 10 टक्के आरक्षण असावे. आरक्षणाची व्याप्ती 50 टक्के आहे, सवर्णांसाठीही 10 टक्के आरक्षण आहे, मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्यांना आरक्षण वाढवायला हवे. 50 टक्के आरक्षणाची व्याप्ती वाढवून 65 टक्के करावी, असे ते म्हणाले. 

नितीश कुमार यांच्या विधानावरुन वाद

बिहारमध्ये जातीवर आधारित सर्व्हेची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. विधानसभेत ही आकडेवारी सादर करण्यात आली. दरम्यान ही आकडेवारी सादर करताना झालेल्या चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद पेटला आहे. नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि महिलांच्या शिक्षणाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करताना असं काही विधान केलं ज्यामुळे विधानसभेतील आमदारांच्या भुवया काहीशा उंचावल्या होत्या. 

चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. जर मुलगी शिकलेली असेल तर लोकसंख्या नियंत्रणात राही असं सांगितलं. हे समजावून सांगताना ते म्हणाले की, "जर मुलगी शिकली असेल तर जेव्हा लग्नानंतर रोज रात्री पुरुष करतात ना, त्यातूनच अजून मुलं जन्माला येतात. जर मुलगी शिकली असेल तर ते आत नका ***, त्याला *** ठेवा असं सांगेल. यातून संख्या कमी होत आहे".

मुख्यमंत्री हे बोलत असताना सभागृहात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिला आमदारही या विधानावर नाराज दिसत होत्या. तर काही आमदारांना हसू आवरतन नव्हतं. नितीश कुमार यांनी संबोधित करताना 2011 मधील जनगणनेनुसार साक्षरता 61 टक्क्यांवरुन वाढून 79 टक्क्यांच्या वर गेली असल्याची माहिती दिली.