'मला फक्त लाज नाही...,' महिलांसंबंधी विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले 'गटरछाप...'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत लैंगिक शोषणावर बोलताना महिलांच्या शिक्षणाचा उल्लेख केला. पण यावेळी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2023, 11:53 AM IST
'मला फक्त लाज नाही...,' महिलांसंबंधी विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले 'गटरछाप...' title=

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यांची जोड लावताना त्यांनी असं काही म्हटलं ज्यामुळे विधानसभेत महिला आमदारांचीही मान शरमेने खाली झुकली होती. दरम्यान आपल्या या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. मी तर महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. मी असंच बोललो होतो, पण जर कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं ते म्हणाले आहेत. 

सभागृहात बोलताना नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर भर देत आहोत असं सांगितलं. "माझ्या एखाद्या विधानाने जर कोणी दुखावलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. जर मी चुकीचं बोललो असेन तर मी वक्तव्य मागे घेतो. मी स्वत: स्वत:ची निंदा करत आहे. मला फक्त लाजच वाटत नाही आहे, तर मी दु:खही व्यक्त करत आहे," असं नितीश कुमार म्हणाले. यादरम्यान विरोधी पक्षाचे आमदार सतत गदारोळ घालत होते.

'लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात, मुलगी शिकली तर नवऱ्याला सांगेल...', मुख्यमत्र्यांचं विधानसभेत आक्षेपार्ह विधान

 

विरोधकांवर टीका करताना नितीश कुमार म्हणाले की, "तुम्ही काल सहमत होतात. आज तुम्हाला माझा विरोध करा असे आदेश देण्यात आले असतील. तुम्ही काही केलं तरी मी तुमचा सन्मान करतो. आता कायदा येत असून, चांगले निर्णय घेतले जातील".

'गटरछाप वक्तव्य'

 केंद्रीय मंत्री आरके सिंग यांनी नितीश कुमार यांचं हे विधान गटारछाप असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "मी बिहारचा आहे. अशी व्यक्ती आमचा मुख्यमंत्री आहे याची लाज वाटते. त्यांनी गटरछाप वक्तव्य केलं आहे. बिहारींची मान शरमेने खाली घालवली आहे. नितीश कुमार अश्लील बोलले आहेत".

तेजस्वी यादव यांनी केली नितीश कुमारांची पाठराखण

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या विधानाची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री यांच्या विधानाकडे दुसऱ्या नजरेने पाहायला हवं. ते फक्त लैंगिक शिक्षणावर बोलत  होते, ज्याचं शिक्षण शाळेत दिलं जातं. सायन्स आणि बायोलॉजीत तर मुलांना हे शिकवतात. त्यांना लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य केलं होतं. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता असं ते म्हणाले. 

नितीश कुमार नेमकं काय म्हणाले होते?

बिहार विधानसभेत मंगळवारी जातीवर आधारित सर्व्हेची आकडेवारी सादर करण्यात आली. ही आकडेवारी सादर करताना झालेल्या चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी एका विधानामुळे वाद पेटला आहे. नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि महिलांच्या शिक्षणाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करताना असं काही विधान केलं ज्यामुळे विधानसभेतील आमदारांच्या भुवया काहीशा उंचावल्या होत्या. 

चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. जर मुलगी शिकलेली असेल तर लोकसंख्या नियंत्रणात राही असं सांगितलं. हे समजावून सांगताना ते म्हणाले की, "जर मुलगी शिकली असेल तर जेव्हा लग्नानंतर रोज रात्री पुरुष करतात ना, त्यातूनच अजून मुलं जन्माला येतात. जर मुलगी शिकली असेल तर ते आत नका ***, त्याला *** ठेवा असं सांगेल. यातून संख्या कमी होत आहे".