नवी दिल्ली : भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज शुक्रवारी अटक केली.
ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह (५१) यांने पाकिस्तानसाठी गुप्त माहिती व कागदपत्रे लीक करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. भारतीय गोपनीय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण मारवाह याने पाकिस्तानी दोन महिला एजंटच्या मदतीने गुप्त माहिती सार्वजनिक केली आहे, असा दावा पोलिसांनी केलाय. हा अधिकारी पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. त्याने हवाई दलातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला देण्यासाठी मदत केली. तो ग्रुप कॅप्टनपदावर कार्यरत होता.
अरुण हा डिसेंबरमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून दोन तरुणींच्या संपर्कात आला. त्या तरुणींनी मॉडेल असल्याचे भासवत अरुणशी संपर्क वाढवला. काही दिवसांनी त्या तरुणींनी अरुणशी अश्लील भाषेत संवाद साधायला सुरुवात केली. अरुण त्यांच्या जाळ्यात अडकताच अरुणकडून गोपनीय माहिती मागवण्यात आली.
अरुणशी ज्या प्रोफाईलवरुन संपर्क साधण्यात आला ते प्रोफाईल फेक असल्याचा संशय आहे. आयएसआयच्या अधिकाऱ्यांनीच हे प्रोफाईल सुरु केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याची माहिती अधिकाऱ्यांना मिळलाच सापळा रचला. ३१ जानेवारीला हवाई दलाने अरुण मारवाहच्या चौकशीला सुरुवात केली.
अरुण मारवाह याचा मोबाईल फोनदेखील जप्त करण्यात आलाय. अरुणने हवाई दलातील गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्स अॅपद्वारे आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे. हवाई दलातील प्रशिक्षण आणि युद्धाशी संबंधित कसरती याबद्दलची माहिती त्याने आयएसआयला पुरवली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांनी अरुण मारवाहला पतियाळा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.