सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही...

IAS officers misused funds : खळबळजनक खुलासा... कोण आहेत सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणारे हे आयएएस अधिकारी? पाहा सविस्तर वृत्त...   

सायली पाटील | Updated: Apr 12, 2024, 12:32 PM IST
सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही...  title=
(छाया सौजन्य- एएनआय/ फेसबुक) big news 3 IAS officers misused funds for lavish upgraded stay on Paris trip says audit report

IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त (खासगी सचिव) आणि अनुराग अग्रवाल (गृह सचिव) या तिन्ही सनदी अधिकाऱ्यांवर पैशांच्या उधळपट्टीची बाब समोर आल्यामुळं नवं संकट ओढावलं आहे. 

समोर आलेल्या माहितीच्या आधारे होणाऱ्या आरोपांनुसार त्यांनी कथित स्वरुपात पॅरिसमधील त्यांचा मुक्काम वाढवत त्यांच्या राहण्याची सोयही तेथील आलिशान हॉटेलमध्ये करत एकमेकांच्याच दौऱ्यांसाठी हिरवा कंदील दाखवला होता. असं करत असताना त्यांनी अनेक नियम धुडकावले होते. 

2015 मध्ये नेमकं काय घडलं होतं? 

2015 मध्ये चंदीगढ प्रशासनाला पॅरिसमधील Foundation Le Corbusier कडून बोलावणं आलं होतं. एका औपचारिक बैठकीसाठी हे निमंत्रण पाठवण्यात आलं असून Swiss-French architect Le Corbusier च्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त तिथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी चंदीगढच्या आखणीसाठीही महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळं तेथील अधिकाऱ्यांनाही समारंभासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. 

औपचारिक बोलावण्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून या कार्यक्रमासाठी चौघांची नावं पुढे करण्यात आली होती. ज्यानंतर आता या दौऱ्यासंदर्भातील एक अहवाल समोर आला, जिथं हे अधिकारीच एकमेकांच्या दौऱ्यांसाठी परवानगी देत असल्याची बाब उघड झाली. विजय देव यांनी विक्रम दत्त यांच्या दौऱ्यासाठी परवानगी दिली होती, दत्त यांनी देव यांच्या दौऱ्याला परवानगी देली होती. विजय देव यांनीच अनुराग अग्रवाल यांच्याही दौऱ्याला परवानगी दिली होती. 

हेसुद्धा वाचा : Loksabha election 2024 : 'असली- नकली शिवसेना अमित शाह ठरवू शकत नाहीत; हातात पैसा आला म्हणून...' संजय राऊतांचे शाब्दिक वार 

या दौऱ्यासाठी प्राथमिक स्वरुपात 18 लाख रुपयांचा निधी ठरवण्यात आला होता. पण, दौऱ्यानंतर ही रक्कम 25 लाखांवर गेली. ज्यामध्ये प्रत्येकी 1.77 लाख रुपयांच्या बिझनेस क्लास तिकीटाचाही समावेश होता. त्याशिवाय ठरलेल्या रकमेपलिकडे जाऊन हॉटेलांवर खर्च करण्यात आल्याची बाबही इथं उघड झाली. सुरुवातीला एका दिवसाचा हा दौरा सात दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आणि इथं रितसर वरिष्ठांच्या परवावनगीचीही पूर्तता झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. दरम्यान हे सर्व करत असताना या अधिकाऱ्यांनी परदेश दौऱ्यासाठी दिल्या जाणाऱ्या खर्चासाठच्या रकमेची मर्यादा ओलांडल्यामुळं आता सर्वसामान्य करदात्यांच्याच पैशांतून त्यांनी स्वत: उधळपट्टी केल्याचं निष्पन्न होत आहे. जे पाहता सर्वांनीच या अधिकाऱ्यांवर तीव्र संतापाचा सूर आळवला आहे.