पलटलेल्या गाडीचा कोंबडीचोर ताबा घेतात तेव्हा...

ज्यांच्या हातात जितक्या कोंबड्या आल्या ते घेऊन लोकं पळत सुटली

Updated: Jan 18, 2022, 09:54 PM IST
पलटलेल्या गाडीचा कोंबडीचोर ताबा घेतात तेव्हा... title=

बिहार : बिहारच्या बेगुसरायमध्ये कोंबड्यांनी भरलेल्या पिकअप गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्यातच पलटी झाली. यानंतर स्थानिक लोकांमध्ये कोंबड्या लुटण्याची स्पर्धा लागली. ज्याच्या हातात जितक्या कोंबड्या आल्या त्या घेऊन लोकं पळत सुटली. धरमपूर चौकाजवळील NH 28 वरची ही घटना आहे. 

कोंबड्यांनी भरलेलं हे पिकअप वाहन दलसिंगसराय इथून बेगुसरायकडे जात होतं. वाटेतच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या मधोमध पलटली. घटनेनंतर चालक आणि क्लिनर घटनास्थळावरून पसार झाले.

चालक आणि क्लिनर पळून गेल्याचे पाहताच तिथे लोकांची एकच गर्दी झाली. लोकांनी पिकअप गाडीतून कोंबड्या चोरून नेण्यास सुरुवात केली. काही लोकांना उलटलेल्या पिकअपवर चढून कोंबड्या बाहेर काढल्या.

काही मिनिटांतच शेकडो कोंबड्या चोरून लोकांनी पळ काढला. बऱ्याच वेळानंतर तेघरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत सर्व कोंबड्या लुटून नेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी रिकामे पिकअप वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. याप्रकरणी पोलिसांनी आता पुढील कारवाई सुरू केली आहे.