आईची हत्या करुन मुलीने मृतदेह सुटकेसमध्ये टाकला अन्... समोर आलं धक्कादायक कारण

Bengaluru Crime : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी एका 39 वर्षीय महिला फिजिओथेरपिस्टने आधी आईची हत्या केली, नंतर मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून पोलीस ठाणे गाठले. सुटकेसमध्ये मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 13, 2023, 11:59 AM IST
आईची हत्या करुन मुलीने मृतदेह सुटकेसमध्ये टाकला अन्... समोर आलं धक्कादायक कारण title=
(फोटो सौजन्य - ANI)

Bengaluru Crime : कर्नाटकातील (Karnataka Crime) बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरुमध्ये एका मुलीने तिच्या आईची हत्या करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरुन स्वतः पोलीस (Karnataka Police) ठाण्यात नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या कृत्याने पोलिसही हादरले आहेत. पोलिसांनी 39 वर्षीय मारेकरी मुलीला तिच्या आईची हत्या करून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरूमधील (Bengaluru News) एका घरामध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रोजच्या भांडणांना कंटाळून हा खून केल्याचे मुलीने सांगितले आहे. घटनेच्या वेळी आरोपी महिलेची सासूही घरात उपस्थित होती मात्र तिला या घटनेची कोणतीही माहिती नव्हती. पोलिसांनी तिला काही विचारण्याआधीच मुलीनेच सगळी हकीकत सांगितली. "मी फिजिओथेरपिस्ट आहे. माझी आणि आईची वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे वैतागून आईची हत्या केली. मला पळून जायचे नाही. त्यामुळेच आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून पोलीस ठाण्यात आणला," असं आरोपी मुलीने म्हटलं आहे.

मुलीने सांगितले की ती मूळची पश्चिम बंगालची आहे. बंगळुरूमध्ये ती पती, सासू आणि आईसोबत राहते. ही रक्तरंजित घटना घडली तेव्हा पती घरी नव्हता. तर सासूबाई दुसऱ्या खोलीत नसल्याने त्यांना याचा थांगपत्ता लागला नाही. सध्या पोलिसांनी आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.

 

मुलीने सोमवारी उबेर ऑटोमधून मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. त्यानंतर मुलगी सेनाली सेन (39) विरुद्ध आयपीसी कलम 302 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही महिला आपल्या शब्दांतून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न करत तर नाही याचाही पोलीस शोध घेत आहेत. ज्या सुटकेमध्ये मुलीने आईचा मृतदेह भरला होता त्याचा व्हिडीओही समोर आला आहे. आईचा मृतदेह असलेली सुटकेस घेऊन मुलगी पोलीस ठाण्यात पोहोचली होती.

दरम्यान, याआधीही अशीच आणखी एक घटना समोर आली होती. कर्नाटकातील बेंगळुरू ग्रामीणमधील बन्नेरघट्टा भागात भाडेकरूंच्या गटाने एका महिलेची हत्या केली होती. आरोपीने आधी महिलेची हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करून जवळच्या अंगणात फेकून दिले होते.