नवी दिल्ली: ऐकावे ते नवलच. दिल्ली पोलिसांनी प्रथमच एका विचित्र टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकूण सहा जणांचा समावेश असलेली ही टोळी केस चोरत असे. एका शॉपमधून या चोरांनी चक्क २५ लाखांचे केस चोरले. केस चोरण्यामागे या चोरांचा उद्देश काय होता? याबाबत पोलीसच नव्हे तर, सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. ६ चौरांपैकी २ चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातून पोलिसांनी या केस चोरट्यांना ताब्यात घेतले.
विग शॉपमधून केसांची चोरी करून हे चोर दिल्ली आणि चंडीगढसारख्या ठिकाणी दुकान सुरू करू इच्छित होते. असे दुकान सुरू करून भरपूर पैसा कमवायचा या टोळीचा उद्देश होता. मंगलसेन व अजय कुमार असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. केसांच्या व्यवसायात प्रचंड पैसा आहे. पण, केसांचा स्टॉक करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे आपन हा प्लॅन केला, असे या दोघांनी पोलिसांना सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, शॉप सुरू करता आले नाही तरी, चोरलेला माल विकून पैसा कमवायचा आमचा प्लान होता.
२७ जुलै या दिवशी मंगलसेन आणि अजयने केसाचे विग बनवणाऱ्या व्यवसायिकाच्या शॉपवर सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात त्यांनी सुमारे २५ लाख रूपयांचे केस पळवले. हे केस तिरूपती बालाजी आणि देशबरातील इतर ठिकाणांहून खरेदी केले जात असते. दरोड्चायी तक्रार आल्यानंतर नांगलोई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून चोरी केलेले २०० किलो वजनाचे २५ लाख रूपये किमतीचे केस आणि एक पिस्तूल जप्त केले. पोलीस या टोळीतील इतर चार सदस्यांच्या शोधात आहेत.
डीसीपी सेजू पी कुरूविल यांनी दिलेल्य माहितीनुसार, जहांगीर हुसेन आपला भाऊ ताजुद्दीन याच्यासोबत नांगलोई एक्सटेंशनमध्ये राहतात. केस खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते तिरूपती बालाजीहून केस खरेदी करून ते नांगलोईला घेऊन येतात. या केसांचे इथे विग बनवले जातात. दरम्यान, २७ जुलैच्या पहाटे त्यांनी पोलिसांना फोन करून शॉपवर दरोडा पडल्याची बातमी दिली होती.