अहमदाबाद : भाजपा अध्यक्ष अमित शहा आज गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गांधीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना अमित शहा मी याच भागातून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली होती. गांधीनगरमधून मी अर्ज भरतोय हे माझं भाग्य असल्याचे म्हटले. मी आज जे काही आहे ते भाजपामुळेच असल्याचे त्यांनी म्हटले.
मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. मी पाच वेळा आमदार आणि गेल्या २५ वर्षांपासून देशातील सर्वांत मोठ्या पक्षासोबत काम करत आहे. कार्यकर्ता ते देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या पदापर्यंत पोहचलो आहे. देशाचं नेतृत्व कोण करणार? या एकाच मुद्यावर २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. आज अरूणाचलपासून ते कन्याकुमारीपर्यंत मोदी हा एकच आवाज आहे.
७० वर्षे देशाची जनता ज्या नेत्याची वाट पाहत होती त्या जनतेला आता असे नेतृत्व करणारा नेता मिळाला आहे. भारतीय जनता पक्ष हा केवळ विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.
५० कोटी गरिबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करणारे पंतप्रधान मोदी हे एक व्यक्ती आहेत. देशाला सुरक्षा कोण देणार? असा सवाल करत शहांनी केवळ पंतप्रधान मोदी हा एकच नेता आणि भाजपा हा एकच पक्ष देशाला संपूर्ण सुरक्षा देऊ शकतो असे म्हटले.
नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पुढचे पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. गुजरातच्या जनतेने गुजरातमधील सर्व २६ जागांवर भाजपालाच निवडून देऊन विजयी करण्याचे आवहनही अमित शहा यांनी केले आहे. अहमदाबादमधील जनतेला संबोधित केल्यानंतर अमित शहा यांच्या रॅलीला सुरूवात झाली झाली आहे.
Gujarat: Bharatiya Janata Party (BJP) President Amit Shah holds a road show in Ahmedabad. pic.twitter.com/T42WkCPz9i
— ANI (@ANI) March 30, 2019