बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं

Bank Cheque Signature Rules: बँकेचे सर्व व्यवहार आता बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीनं पार पडत असले तरीही काही व्यवहार मात्र अद्यापही प्रत्यक्षात बँकेत उपस्थित राहून करावे लागतात. चेक भरणं, तो बँकेत जाऊन डिपॉझिट करणं त्यातलीच काही कामं.   

सायली पाटील | Updated: Aug 7, 2023, 12:15 PM IST
बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं title=
Bank Cheque Payment Signature Rules latest update

Cheque Signature Mismatch: 'मला ना बँकेची कामं कळतच नाहीत...', बँकेचं नाव घेताच अनेकांच्या मनात असणारी भीती बऱ्याचदा बाहेर येते. तुमच्या आजुबाजूलाही यातली काही मंडळी असतील. बँकेचे व्यवहार लक्षात राहत नसले, व्याजदर, वगैरे गोष्टी कळत नसल्या तरीही काही मुद्दे माहित करून घेणं कधीही महत्त्वाचं आणि फायद्याचं ठरतं. चेक भरणं हे त्यापैकीच एक. 

आपण, जेव्हा खात्यावरून पैसे काढण्यासाठी जातो आणि आपल्या खात्याचाच एक चेक पुढे करतो तेव्हा तिथं असणारे बंक कर्मचारी, कॅशिअर चेकवर आपली सही आहे की नाही हे पडताळतात आणि चेकच्या मागच्या बाजूवरही सही घेतात. चेकच्या पुढील बाजूला सही घेण्यापर्यंत ठीक. पण, चेकच्या मागच्या बाजुला कोणताही रकाना नसतानाही ही मंडळी का बरं सही घेतात? यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 

इथं एक गोष्ट लक्षात घ्या, जर कोणी खातेधारक आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी चेक जमा करत असेल तर, कॅशिअर त्या व्यक्तीला पैसे देतो, हे पैसे घेऊन समोरील व्यक्ती घरी निघून जातो. ही झाली नाण्याची पहिली बाजू, आता या नाण्याची दुसरी बाजू पाहा. याच व्यक्तीनं थोड्या वेळानं पकत येत माझं टोकन गहाळ झालंय असं काहीतरी कारण देत पुन्हा पैसे काढून घेण्याची मागणी केली तर? 

हेसुद्धा वाचा : उरले फक्त 2 दिवस... Chandrayaan 3 चंद्रापासून नेमकं किती किलोमीटर दूर? इस्रोची नवी Update पाहाच 

इथं कॅशिअरकडे पैसे देण्याचा कोणताही पुरावा नसेल. तर, अशा परिस्थितीत चेकच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली सही मोठी मदत करून जाईल. बँकेच्या नियमांअंतर्गत तयार करण्यात आलेली ही जणू एक सुरक्षा व्यवस्थाच आहे. कारण, या माध्यमातून फसवेगिरी टाळता येते. टोकन घेतल्यानंतर जर कोणा व्यक्तीकडून ते हरवतं आणि चुकीची व्यक्ती पैसे घेण्यासाठी पोहोचतं अशा परिस्थितीत त्यांना मूळ खातेधारकाची सही करता येणार नाही आणि ही फसवेगिरी पडकली जाईल. 

बेअरर चेकच्या माध्यमातून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी त्याच्या पॅनकार्डावरील स्वाक्षरीशी मिळतीजुळती असल्यासच बँकेतून त्याला पैसे दिले जातात. सोबतच त्या व्यक्तीचा पॅन क्रमांकही घेतला जातो. खातेधारकांच्या सुरक्षिततेसाठीच बँकेनं हा उपाय योजला आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेचा व्यवहार चेकनं करत असाल तर ही बाब लक्षात ठेवा. बँकेचे व्यवहार करताना कायम सतर्क राहा.