सिगरेटच्या राखेमुळे 27 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची करत होता तयारी

Bangalore Accident : बंगळुरुमध्ये एका इंजिनिअर तरुणाचा इमारतीच्या 33 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाच्या मैत्रिणीला वॉकिंग ट्रॅकजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 1, 2024, 10:03 AM IST
सिगरेटच्या राखेमुळे 27 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची करत होता तयारी title=

Bangalore Accident : बंगळुरुमधून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या एका 27 वर्षीय इंजिनियअर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिगरेटची राख फेकालायला जात असताना इमारतीवरुन पडून या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे इंजिनिअर तरुणाच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

बंगळुरुमध्ये एका इमारतीच्या 33व्या मजल्यावरून पडून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी हा इंजिनिअर तरुण चुकून मैत्रिणीच्या फ्लॅटवरून खाली पडला होता. दिव्यांशु शर्मा असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. केआर पुरममधील पश्मिना वॉटरफ्रंट अपार्टमेंटमधील मैत्रिण मोनिकाच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली. मोनिकाच्या घरी दिव्यांशु आणि आणखी एक मित्र एकत्र नवीन वर्ष साजरे करणार होते. मात्र शुक्रवारीच उंच इमारतीच्या बाल्कनीतून पडून दिव्यांशुचा मृत्यू झाला आहे. दिव्यांशु सिगरेटची राख टाकण्यासाठी बाल्कनीत गेला असताना हा अपघात घडला.

त्यानंतर इमारतीमधील काही रहिवाशांनी सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिव्यांशू खाली पडल्याची माहिती दिली. मोनिकाने हा मेसेज पाहिल्यानंतर ती तात्काळ तिच्या मित्रासह दिव्यांशुच्या शोधात निघाली. शोधाशोध केल्यानंतर वॉकिंग ट्रॅकजवळ दिव्यांशुचा मृतदेह पडलेला असल्याचे मोनिकाने पाहिले. तिने लगेचच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मोनिका, दिव्यांशु आणि आणखी एक मित्र एका पबमध्ये गेले होते आणि पहाटे 2.30 च्या सुमारास घरी परतले. जेव्हा त्याचे मित्र बेडरूममध्ये झोपले होते तेव्हा दिव्यांशु हॉलमध्ये झोपला होता. सकाळी 7 च्या सुमारास इतर झोपले असताना दिव्यांशुने साफसफाई करण्यास सुरुवात केली. तो सिगारेटची राख फेकण्यासाठी तो बाल्कनीत गेला होता. त्यावेळी त्याचा तोल गेला असावा आणि तो घरामधून पडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत दिव्यांशूचे वडील भारतीय हवाई दलाचे निवृत्त कर्मचारी असून ते कुटुंबातील इतर सदस्यांसह होरामावू येथे राहतात. गुरुवारी रात्री दिव्यांशु आणि इतर तीन मित्र मोनिकाच्या दुसर्‍या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेले होते. तिथे त्यांनी एकत्र चित्रपट पाहण्याचा बेत आखला. चित्रपट पाहिल्यानंतर ते पबमध्ये गेले आणि रात्री उशिरा परतले. मात्र सकाळी दिव्यांशूचा 33 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला.