Balasore School Demolished: ओडिशामध्ये (Odisha) 2 जून रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेत 288 लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे. या ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह बालासोरमधील (Balasore) एका शाळेत ठेवण्यात आले होते. शाळेला तात्पुरतं शवगृह केल्याने विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक नाराज आहेत. शाळेत मृतदेह ठेवण्यात आले होते या कारणाने विद्यार्थी तिथे जाण्यास घाबरत आहेत. यामुळे अखेर सरकारने ही शाळा पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
ही शाळा बालासोर जिल्ह्याच्या बहनागा गावात आहे. शाळेचा वापर मृतदेह ठेवण्यासाठी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यास नकार दिला आहे. यानंतर शुक्रवारी ओडिशा सरकारने शाळा जमीनदोस्त करत नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक विद्यार्थी भीतीपोटी शाळेत जाण्यास नकार देत आहेत. यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शवगृह म्हणून वापरण्यात आलेली शाळेची ही इमारत जमीनदोस्त करुन नव्याने बांधण्याचे आदेश दिले आहेत.
#WATCH | Odisha | Parts of Bahanaga school building in Balasore are being razed. This comes after the parents expressed their reluctance in sending their children to school after it was turned into a temporary mortuary for the deceased of #BalasoreTrainAccident
A teacher says,… pic.twitter.com/dm4zt5mHwZ
— ANI (@ANI) June 9, 2023
ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना आणि मुख्यमंत्री यांचे सचिव पी के पांडियन यांची यासंबंधी स्थानिक आणि शाळा व्यवस्थापनासह बैठक पार पडली. यावेळी शाळेतील शिक्षकही उपस्थित होते. बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी संपूर्ण शाळा पाडणार नाही असं सांगितलं आहे. तर शाळेचा एक भाग पाडण्यात येणार आहे. या भागाचा वापर जेवण्यासाठी केला जात होता.
65 वर्षीय जुन्या इमारतीत मृतदेहांचा खच होता. यानंतर विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शाळेत पाठवताना घाबरत होते. शाळा व्यवस्थापन समितीने राज्य सरकारला ही इमारत पाडण्याची विनंती केली होती.
बहनाहा शाळा व्यवस्थापनाने सांगितलं आहे की, विद्यार्थी प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांच्या मनातून भीती घालवण्यासाठी अध्यात्मिक कार्यक्रम आखण्याची योजना आहे. दरम्यान, शाळेचे काही वरिष्ठ विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट बचावकार्यात सहभागी झाले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे.
शाळा व्यवस्थापनाच्या एका सदस्याने सांगितलं की, मुलांनी टीव्हीवर शाळेत मृतदेह ठेवण्यात आल्याचं पाहिलं होतं. यानंतर त्यांना आपण जातोय त्याच शाळेत मृतदेह ठेवले होते हे विसरणं कठीण जात आहे.
शाळा व्यवस्थापनाने फक्त 3 वर्गांमध्ये मृतदेह ठेवण्याची परवानगी दिली होती. पण नंतर जिल्हा प्रशासनाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाटी ते मोकळ्या हॉलमध्ये ठेवले होते. शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमची मुलं शाळेत जाण्यास नकार देत आहेत. मुलांची आईही त्यांना शाळेत पाठवण्यास इच्छुक नाही. काही पालक तर मुलांची शाळा बदलण्याचा विचार करत आहेत".
"जिल्हाधिकारी काल शाळेत आले होते. या ठिकाणी घाबरण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. येथे कोणताही आत्मा नाही. ही फक्त अंधश्रद्धा आहे. पण तरीही ही पाडून नवीन इमारत बांधली जाईल," असं एका शिक्षकाने सांगितलं आहे.