लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊमध्ये बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. आपल्या या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, मी कधीही लोकसभेची निवडणूक लढवून जिंकू शकते. आमची आघाडी खूप भक्कम स्थितीत आहे. अशावेळी महाआघाडीला निवडून आणणे गरजेचे आहे. राजकारणात अनेक मोठे निर्णय घ्यावे लागतात. सध्या देशाचे हित आणि पार्टीची चळवळ पाहता, यंदाची निवडणूक लढणार नाही. भविष्यात गरज पडल्यास मी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेईन, असे मायावतींनी सांगितले. मायावती नगीना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
Bahujan Samaj Party (BSP) Chief Mayawati: I will not contest the Lok Sabha elections. pic.twitter.com/88oGmtd6Ww
— ANI UP (@ANINewsUP) March 20, 2019
केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत मायावती यांचा बसपा आणि अखिलेश यांचा समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. राज्यातील एकूण ८० जागांपैकी सपा ३८ तर बसपा ३७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ काँग्रेससाठी सोडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजपनेही सपा-बसपला टक्कर देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे विणून भाजपने मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याठिकाणी गोमांस बंदी, राम मंदिर या मुद्द्यांवरून भाजपचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप ८० पैकी ७३ जागा जिंकेल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.