'रेहमानला कशाला आपली...'. कावड यात्रेसंबंधीच्या आदेशावर बाबा रामदेव स्पष्टच बोलले

उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारनंतर आता उज्जैनमधील (Ujjain) महापालिकेनेही दुकानदारांना त्यांची नावं प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे. योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी या आदेशाचं समर्थन केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 21, 2024, 12:30 PM IST
'रेहमानला कशाला आपली...'. कावड यात्रेसंबंधीच्या आदेशावर बाबा रामदेव स्पष्टच बोलले title=

योगगुरु आणि उद्योजक बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने कावड यात्रेसंबंधी काढलेल्या आदेशाला पाठिंबा दिला आहे. कावड यात्रा (Kanwar Yatra) मार्गावरील दुकारनदारांनी आपली नावं प्रदर्शित करायला हवीत असा आदेश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने दिला आहे. बाबा रामदेव यांनी निर्णयाला पाठिंबा देताना प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असायला हवा असं म्हटलं आहे. जर रामदेवला आपलं नाव उघड करण्यात काही समस्या नाही, तर मग रेहमानला का असावी? अशी विचारणा त्यांनी केली आहे.  

"जर रामदेव यांना त्यांची ओळख उघड करण्यात काही अडचण नाही, तर रहमान यांना त्यांची ओळख उघड करण्यात अडचण का आहे? प्रत्येकाला त्यांच्या नावाचा अभिमान असायला हवा. नाव लपवण्याची गरज नाही, फक्त कामात शुद्धता हवी. जर आपलं काम शुद्ध असेल तर आपण हिंदू, मुस्लीम किंवा इतर कोणत्याही समुदायाचे असलो तरी काही फरक पडत नाही," असं बाबा रामदेव म्हणाले आहेत. 

उज्जैनमध्येही दुकानदारांना आदेश

उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर उज्जैन नगरपालिकेनेही दुकानदारांना त्यांची नावं प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे. उज्जैनचे महापौर मुकेश ततवाल यांनी शनिवारी सांगितलं की, उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी 2000 आणि या आदेशाचे उल्लंघन केल्यास 5,000 दंड भरावा लागेल.

“उज्जैन हे धार्मिक आणि पवित्र शहर आहे. लोक येथे धार्मिक आस्थेने (श्रद्धेने) येतात. ज्या दुकानदाराच्या सेवा ते घेत आहेत त्याबद्दल जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. जर एखादा ग्राहक असमाधानी असेल किंवा फसवणूक होत असेल, तर दुकानदाराचे तपशील जाणून घेतल्यास ते निराकरण करू शकतात,” असं ते म्हणाले आहेत.

विरोधकांकडून टीका

अनेक विरोधी नेत्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हे भारतातील मुस्लिमांबद्दल वाढता द्वेष दर्शवते अशी टीका केली आहे. "उत्तर प्रदेशातील कावड मार्गांवर भीती: हे भारतीय मुस्लिमांच्या द्वेषाचे वास्तव आहे. या द्वेषाचे श्रेय राजकीय पक्षांना, हिंदुत्वाच्या नेत्यांना आणि तथाकथित लिप सर्व्हिसिंग सेक्युलर पक्षांना जाते," असं त्यांनी एक्सवर म्हटलं आहे. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनीही योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला. "उत्तर प्रदेश सरकार असे आदेश देऊन भारताच्या राज्यघटनेचा नाश करत आहे. संपूर्ण समाजाचा अपमान होत आहे. ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे जर्मनीत नाझींनी लक्ष्य केलं होतं. मी याचा निषेध करते," असं त्या म्हणाल्या आहेत. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. भाजपा देशातील एकता संपवत असल्याचं ते म्हणाले आहेत. "आता तुम्ही (भाजप) खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जात आणि धर्मावर आधारित नेमप्लेट लावण्याचे निर्देश देत आहात? तुम्हाला देशाचे विभाजन करायचे आहे का? तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही देशाची एकात्मता भंग करत आहात," असं राऊत म्हणाले.