केदारनाथ धामची कवाडं उघडली; पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या नावे

पाहा केदारनाथ धामची काही दृष्यं...

Updated: Apr 29, 2020, 09:06 AM IST
केदारनाथ धामची कवाडं उघडली; पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या नावे title=
केदारनाथ धाम

केदारनाथ : भगवान केदारनाथ धामची कवाडं ग्रीष्काळासाठी बुधवारी सकाळी खोलण्यात आली. आता पुढच्या 6 महिन्यांपर्यंत केदारनाथ धाममध्ये पूजा होणार आहे. सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कवाडं उघडल्यानंतर पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली. 

केदारनाथ धाम 10 क्विंटल फूलांनी सजवण्यात आलं आहे. आता केवळ बाबा केदारनाथ यांच्या पूजेसाठी मंदिराची कवाडं उघडण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसमुळे जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना केदारनाथ धाममध्ये दर्शन करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. सध्या केवळ देवस्थान बोर्डच्या 16 सदस्यांनाच पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

चार धाम यात्रेचा अद्याप निर्णय नाही -

कोरोना व्हायरसमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम चार धाम यात्रेवरही झाला आहे. चार धाम यात्रा होणार की नाही, याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यात्रासंबंधी सरकारकडून कोणताही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाही.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी बाबा केदारनाथची कवाडं उघडल्यानंतर भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी, 'बाबा केदारनाथ आपला आशिर्वाद कायम राहू दे,  कोरोनामुळे नागरिकांना दर्शन घेता येणार नाही. परंतु केदारनाथच्या आशिर्वादाने आपण कोरोनाच्या या महामारीला हरवण्यात यशस्वी होऊ.' अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

चारधाम यात्रांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे दरवर्षी अनेक भक्तांच्या नजरा लागलेल्या असतात. पण, देशात आलेलं कोरोना व्हायरसचं संकट पाहता यंदाच्या वर्षी चारधाम यात्रेवरही हे सावट असल्याचं पाहायला मिळत आहे.