Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : मंदिर वही बनायेंगे... असं म्हणता म्हणता अखेर अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहून आता त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लांच्या विलोभनीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
भारतासोबतच संपूर्ण जगासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण 22 जानेवारी रोजी सर्वांनाच याचिदेही याची डोळा पाहता येणार आहे. कारण हा क्षण असणार आहे अयोध्येतील राम मंदिरामध्ये राम लल्लांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा. देशविदेशातील मोठ्या आणि मानाच्या व्यक्तींची या सोहळ्यासासाठी उपस्थिती असणार आहे. या क्षणी इथं हजारो भाविकांचीही हजेरी असणार आहे. जिथं मंत्रोच्चारांसह यथासांग पूजेनंतर रामलल्ला त्यांच्या स्थानी विराजमान होणार आहेत.
अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांचा एकंदर आकडा पाहता राम मंदिर विश्वस्त मंडळ आणि उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं इथं येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एक App लाँच करण्यात आलं आहे. Divya Ayodhya app असं नाव या अॅपला देण्यात आलं असून, अयोध्येला जाणाऱ्या सर्वांनाच ते डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अयोध्येमध्ये आतापासूनच भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, इथं येणाऱ्या भाविकांची तोबा गर्दी पाहता हे अॅप लाँच करण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून हॉटेल बुकिंग करता येणार आहे. शिवाय या अॅपमध्ये Delux Hotel ची यादीसुद्धा देण्यात आली आहे. एका अॅपमुळं अयोध्येत येणाऱ्या प्रत्येकालाच सर्व सविस्तर माहिती अगदी सोप्या स्वरुपात मिळणार आहे. इथूनच तुम्हाला Online Parking Booking आणि इथं भटकंती करण्यासाठी Tourist Guide सुद्धा बुक करता येणार आहे.
येत्या काळात अयोध्येमध्ये भाविकांसोबतच जगभरातून पर्यटकांची गर्दी होणार आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता या अॅपमध्ये 22 भाषांमध्ये अंतर्गत सर्च ऑप्शन देण्यात आलं आहे. थोडक्यात 22 भाषांमध्ये तुम्हाला अयोध्या आणि आजुबाजूच्या परिसरातील व्यवस्था आणि इतर माहिती मिळू शकणार आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हीला Playstore वर जावं लागणार आहे. इथं तुम्ही अॅपच्या नावानं सर्च करून ते डाऊनलोड करू शकणार आहात. अयोध्येत जायचा बेत आखत असाल तर वाट कसली पाहताय? आताच डाऊनलोड करा हे अॅप.