Ayodhya Ramlalla Idol : श्रीराम जन्मभूमी अशी ओळख असणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये अखेर भव्य राम मंदिर उभं राहिलं आणि प्रदीर्घ काळासाठी सुरु असणारी प्रतीक्षा अखेर संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर, महंत आणि साधूसंतांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि त्या क्षणापासून राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये भाविकांनी लांबच लांब रांगा लावण्यास सुरुवात केली. रामलल्लाच्या मूर्तीचं लोभस रुप अनेकांनाच भावलं आणि प्रत्येकानंच या मूर्तीचं कौतुक केलं.
देशातील सर्वोत्तम अशा या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची चर्चा अद्यापही थांबलेली नाही. पण, त्यातच आता आणख एका मूर्तीची चर्चा नव्यानं सुरु झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चर्चेत असणारी ही मूर्ती अतिशय प्राचीन असून, त्यामध्ये आणि अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीमध्ये बरंच साम्य पाहायला मिळत आहे.
कर्नाटकच्या राजचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पात्रात भगवान श्रीविष्णूची एक प्राचीन मूर्ती नुकतीच सापडली आहे. प्राथमिक माहिती आणि प्रत्यक्षदर्शींनुसार या मूर्तीमध्ये आणि मूर्तीकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीमध्ये अनेक गोष्टी एकसारख्या असल्याचं स्पष्ट होत आहे. पुरातत्त्वं खात्यातील जाणकारांच्या मते ही मूर्ती साधारण 11, 12 व्या शतकातील असू शकते. रामलल्लाच्याच मूर्तीप्रमाणं विष्णूच्या या पुरातन मूर्तीची प्रभावळही अतिशय सुरेखपणे कोरण्यात आली असून, त्यावरही दशातवतारी रुपं साकारण्यात आली आहेत.
फक्त श्रीविष्णूंचीच मूर्ती नव्हे, तर नदी पात्रातून एक शिवलिंग सापडल्याचीही माहिती समोर आली आहे. रायचूर विद्यापीठातील इतिहास आणि पुरातत्व विभागातील शिक्षिका डॉ. पद्मजा देसाई यांच्या माहितीनुसार या मूर्ती निश्चितपणे कोणा एका मंदिरातील गर्भगृहात विराजित असाव्यात. या मंदिरावर हल्ला, मोडतोड किंवा तत्सम घटनांपासून मूर्ती सुरक्षिक राहाव्यात या कारणानं त्या नदीच्या पात्रात विसर्जित करण्यात आल्या असाव्यात. या मूर्तींना यामुळं काही प्रमाणात नुकसान पोहोचलं असलं तरीही त्यावर असणारं कोरिवकाम मात्र फार स्पष्टपणे पाहता येत आहे.
डॉ. देसाई यांच्या माहितीनुसार नदी पात्रातून सापडलेल्या या मूर्तीवर अतिशय नाजूक नक्षीकाम करण्यात आलं आहे. या मूर्तीच्या प्रभावळीमध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिम्हा, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की ही रुपं साकारण्यात आली आहेत. चार भुजा असणाऱ्या या मूर्तीच्या दोन भूजा वरच्या बाजूस दिसत आहेत, त्यामध्ये शंख आणि चक्र आहेत. तर, त्याखाली असणाऱ्या दोन भूजा आशीर्वाद मुद्रेमध्ये दिसत आहेत. यापैकी एक कटी हस्त आणि दुसरा वरद हस्त आहे.
या मूर्तीवर कुठेही गरुडाचं चिन्हं दिसत नाहीये. विष्णूच्या अनेक मूर्तींसमवेत बऱ्याचदा गरुडाची प्रतिकृती पाहायसा मिळते. या मूर्तीचं रुप पाहता त्याचा संदर्भ व्यंकटेश्वराशी जोडला जाऊ शकतो. विष्णूच्या या रुपामध्ये देवाला दागिन्यांचा आणि फुलांचा साज केला जात असे त्याचीच झलक या मूर्तीमध्ये पाहता येत आहे.