Dry Day On January 22: अयोध्येमधील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी 22 जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
"हे आपलं सौभाग्य आहे की छत्तीसगढ भगवान श्रीरामाचं आजोळ आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त संपूर्ण छत्तीसगढमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी संपूर्ण राज्य एखादा उत्सव असल्याप्रमाणे जल्लोष साजरा करणार आहे. घरोघरी दिवाळी असल्याप्रमाणे दीप प्रज्वलन केलं जाईल. छत्तीसगढ सरकारने 22 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे," असं साय यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"श्री रामलल्लाच्या प्रसादासाठी त्यांचं आजोळ असलेल्या छत्तीसगढमधील शेतकऱ्यांच्यावतीने भाज्यांचा पुरवठा केला जाणार आहे. या भाज्यांची खेप अयोध्येला पाठवली जाणार आहे. यापूर्वी 30 डिसेंबर रोजी राइल मिलर्सच्या मदतीने श्री रामलल्लाला भोग दाखवण्यासाठी छत्तीसगढमधून 300 मेट्रिक टन सुंगधित तांदूळ अयोध्येला पाठवण्यात आला आहे," अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
साय यांनी छत्तीसगढ सरकारने राज्यामध्ये 25 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान सुशासन सप्ताह साजरा केल्याची माहिती दिली. "आमच्या सुशासनाचा संकल्प आणि आदर्श हे रामराज्यच आहे," असंही मुख्यमंत्री म्हणाले.
22 जनवरी को छत्तीसगढ़ में उत्सव का शुभ दिन
छत्तीसगढ़ सरकार ने दिनांक 22 जनवरी, 2024 को भगवान श्री रामलला जी की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा के शुभ अवसर पर छत्तीसगढ़ में 'शुष्क दिवस' (Dry Day) घोषित किए जाने का निर्णय लिया है।
— Vishnu Deo Sai (@vishnudsai) January 2, 2024
धान्यचं कोठार अशी ओळख असलेलं छत्तीसगढ हे राज्य प्रभू रामचंद्रांचं आजोळ असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते भगवान राम 14 वर्षांच्या वनवासादरम्यान छत्तीसगढमधील अनेक ठिकाणांवरुन प्रवास केला. राज्याची राजधानी रायपूरपासून 27 किलोमीटर दूर असलेल्या चंदखुरी गाव हे भगवान श्रीराम यांची आई कौशल्या मातेचं जन्मस्थान मानलं जातं. गावातील प्राचीन माता कौशल्या मंदिराला मागील काँग्रेस सरकारच्या काळात जिर्णोद्धार करण्यात आला होता.