अयोध्या प्रकरणात युक्तीवाद पूर्ण, आमच्याच बाजुनं निर्णय येणार - महंद धर्मदास

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी आनंद व्यक्त केलाय

Updated: Oct 16, 2019, 08:36 PM IST
अयोध्या प्रकरणात युक्तीवाद पूर्ण, आमच्याच बाजुनं निर्णय येणार - महंद धर्मदास title=

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात सर्व पक्षकारांकडून युक्तीवाद बुधवार पूर्ण झाला. त्यानंतर आता सर्वेोच्च न्यायालयानं निर्णय सुरक्षित ठेवलाय. परंतु, हा निर्णय १७ नोव्हेंबरच्या आधीच येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होणार आहेत. तेच या प्रकरणासाठी गठित करण्यात आलेल्या पीठाचे अध्यक्ष आहेत. तब्बल ४० दिवसांपर्यंत चाललेली अयोध्य प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झालीय. कोर्टानं 'मोल्डिंग ऑफ रिलीफ'वर सर्व पक्षांना लिखित स्वरुपात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी आनंद व्यक्त केलाय. आपल्याच पक्षात निर्णय येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील वरुण सिन्हा यांनीही 'न्यायावर सगळ्यांचा विश्वास असून आमच्याच बाजूनं निर्णय येईल' असं म्हटलंय. 

रामजन्मभूमी खटल्यात अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू असताना मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी 'हाय-व्होल्टेज' ड्रामा केला. हिंदू पक्षाचे वकील विकास सिंह यांनी काही नकाशे कोर्टासमोर ठेवले. तसंच वादग्रस्त जमिनीवर मंदिर असल्याचं सिद्ध करण्यासाठी आयपीएस किशोर कुणाल यांच्या 'अयोध्या रिव्हिजिटेड' या पुस्तकाचा हवाला दिला. मात्र, हा दावा राजीव धवन यांनी फेटाळून लावला. त्यानंतर विकास सिंह यांनी त्यांच्यासमोर नकाशा ठेवला असता धवन यांनी तो फाडून टाकला. त्यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशीच परिस्थिती राहिली तर आता सुनावणी संपल्याचं जाहीर करून लेखी स्वरुपात युक्तिवाद घेणार असल्याची तंबी दिली.