प्रवाशांना जागेवरच मिळणार स्वादिष्ट जेवण; रेल्वेची खास सुविधा

रेल्वेकडून ट्रेन साइड वेण्डिंग योजना सुरु करण्यात येणार आहे.

Updated: Oct 16, 2019, 07:11 PM IST
प्रवाशांना जागेवरच मिळणार स्वादिष्ट जेवण; रेल्वेची खास सुविधा title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना आता 'आयआरसीटीसी'च्या (IRCTC) बेस किचनमध्ये बनणारे जेवण मिळू शकणार आहे. रेल्वेकडून ट्रेन साइड वेण्डिंग योजना सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना फोनवरुन त्यांच्या पसंतीचे जेवण मागण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

ट्रेन साइड वेण्डिंग योजनेअंतर्गत, पॅन्ट्रीकार नसणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांना स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण देण्याच्या योजनेवर विचार केला जात आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या मागणीनुसार IRCTCच्या बेस किचनमधून जेवण आणून ते ट्रेनमध्ये चढवण्यात येणार आहे. या योजनेमुळे प्रवाशांना त्यांच्या जागेवरच त्यांच्या आवडीचे जेवण मिळू शकेल.

या सुविधेसाठी ट्रेनमध्ये एक कॅटरिंग मॅनेजर असेल, जो प्रवाशांच्या मागणीनुसार, जेवण ट्रेनमध्ये मागवून ते प्रवाशांपर्यंत पोहचवण्याचे काम करेल. संपूर्ण देशात जवळपास ७०० ट्रेनमध्ये ही सुविधा दिली जाण्याची योजना आहे.

प्रवाशांना चांगले जेवण देण्यासह, ट्रेनमध्ये बेकायदेशीर विक्रेत्यांना आळा घालणे हादेखील वेण्डिंग योजना सुरु करण्यामागील रेल्वेचा उद्देश असल्याची माहिती आहे. प्रवाशांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाल्यास अवैध वेण्डिंगवर आपोआपच लगाम बसणार असल्याची शक्यता आहे.