भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भाषणात अशा नेत्यांची कानउघाडणी केली आहे जे प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात आणि त्यावरुन वाद निर्माण होतात. पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांना अनावश्यक विधान करण्याचं टाळावं असं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आपली नाराजी व्यक्त करताना, एकीकडे पक्षाचे मोठे नेते दिवसरात्र काम करत असताना काही लोक चित्रपटांबद्दल विधानं करत आहेत असं म्हटलं आहे.
आम्ही दिवसभर काम करतो आणि काही लोक एखाद्या चित्रपटाबद्दल विधान करतात. त्यानंतर संपूर्ण दिवस टीव्ही आणि प्रसारमाध्यमांवर तेच सुरु असतं. अनावश्यक विधानं करणं टाळलं पाहिजे, अशा शब्दांमध्ये मोदींनी नेत्यांना समज दिली. मुस्लिम समाजाबद्दल अनावश्यक विधानं करु नये, असा सल्लाही मोदींनी दिला आहे.
Some glimpses from the 2nd day of the BJP National Executive meeting. pic.twitter.com/m8GkHGg758
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2023
मागील महिन्यामध्ये 'पठाण' चित्रपटामधील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटामध्ये काही वादग्रस्त दृश्य आहेत, असं म्हटलं होतं. ही दृश्य काठून टाकली नाही तर 'पठाण' चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असंही मिश्रा म्हणाले होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डने 'पठाण'च्या निर्मात्यांना काही दृश्यांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. या निर्णयाचं मिश्रा यांनी स्वागत केलं होतं.
'पठाण' चित्रपटासंदर्भातील सेन्सॉर बोर्डाचा निर्णय कौतुकास्पद आहे. रील लाइफ रियल लाइफवर फार परिणाम करते. निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना याचं भान ठेवलं पाहिजे असंही मिश्रांनी म्हटलं होतं.
महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि आमदार राम कदम यांनी निर्मात्यांना प्रश्न विचारताना हे सारं प्रसिद्धीसाठी केलं की यामागे काही कट होता असं म्हटलं होतं. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या आदर्शावर चालणारं भाजपा सरकार आहे. त्यामुळे सरकारने हिंदुत्ववाद्यांच्या भावानांचा अपमान करणाऱ्या चित्रपटांबरोबर मालिकांवर बंदी घालावी अशी मागणी राम कदम यांनी केली होती.