नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे राजकारणाबरोबर संयत पण परखड अशा शैलीतील वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते. संसदेतील त्यांची अनेक भाषणे ऐतिहासिक अशीच ठरली. अशाच एका प्रसंगी वाजपेयींनी भाजपवर सभ्यता सोडून टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फटकारले होते.
सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात भाजपचा उल्लेख करताना Incompetent (अक्षम), Insensitive (असंवेदनशील), Irresponsible (बेजबाबदार) और Brazenly Corrupt (भ्रष्टशिरोमणी) असे शब्द वापरले होते.
यानंतर जेव्हा वाजपेयी भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी म्हटले की, मी श्रीमती सोनिया गांधी यांचे भाषण वाचले. त्यांनी शब्दकोशातील मिळतील सर्व शब्द जमा करुन भाजपवर टीका केली. राजकीय क्षेत्रात जे विरोधी पक्ष तुमच्या बरोबरीने उभे आहेत त्यांचे मूल्यमापन तुम्ही अशाप्रकारे करता. आपल्यात मतभेद असतील, ते व्यक्त करण्याची ही पद्धत आहे का?, असा सवाल वाजपेयींनी सोनियांना विचारला.
तसेच भाजपने जनमताचा विश्वासघात केला, या सोनियांच्या टीकेलाही वाजपेयींनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. आम्ही जनमताचा विश्वासघात केला, हे ठरवणारे तुम्ही कोण? भविष्यात निवडणुका होतील तेव्हा दोन हात करु. मात्र, तोपर्यंत लोकशाहीच्या मर्यादा पाळा आणि सभ्यतेने वागा, असे वाजपेयींनी सांगितले होते.