Assembly By-election 2022: देशात आज गुरुवारी सहा राज्यांतील 7 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. आज पोटनिवडणूक होत असलेल्या 6 राज्यांपैकी 3 ठिकाणी भाजप किंवा भाजप युतीचे सरकार आहे आणि उर्वरित 3 ठिकाणी प्रादेशिक पक्षांचे किंवा त्यांच्या आघाडीचे सरकार आहे. उत्तर प्रदेशमधील गोला गोकरनाथ, बिहारमधील गोपालगंज आणि मोकामा, तेलंगणातील मुनुगोडा, हरियाणातील आदमपूर, महाराष्ट्रातील (Maharashtra) अंधेरी पूर्व आणि ओडिशातील धामनगर विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
मुंबईतल्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक आज होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल. ठाकरे गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात अपक्ष मिलिंद कांबळेंसह सात अपक्ष रिंगणात आहेत. मतदानासाठी 1 हजार 600 कर्मचारी आणि 1 हजार पोलीस तैनात करण्यात आलेत. तर 2 लाख 71 हजार मतदार आहेत.
हरियाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघ पाच दशकांपासून भजनलाल कुटुंबाचा बालेकिल्ला आहे आणि तो राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 'महागठबंधन' सरकार स्थापन झाल्यानंतर बिहारमधील ही पहिलीच निवडणूक चाचणी आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूने भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर बिहारमध्ये पहिली पोटनिवडणूक होत आहे.
भाजप उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथ जागा राखण्याचा प्रयत्न करत आहे, तर सत्ताधारी बीजेडी-शासित ओडिशातील विद्यमान आमदाराच्या निधनामुळे रिक्त झालेल्या धामनगर जागेवर सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी दिवंगत आमदाराच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तेलंगणातील मुनुगोडा जागेवर भाजप आणि सत्ताधारी टीआरएसने आक्रमक प्रचार केला आहे. काँग्रेस आमदाराच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती आणि आता ते पुन्हा भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत.
भजनलाल यांचा धाकटा मुलगा कुलदीप बिश्नोई याच्या राजीनाम्यामुळे हरियाणाच्या आदमपूर जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये कुलदीपने काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या जागेवरुन बिष्णोई यांचा मुलगा भव्य हे भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आदमपूर ही जागा 1968 पासून भजनलाल कुटुंबाकडे आहे आणि दिवंगत मुख्यमंत्र्यांनी नऊ वेळा, त्यांच्या पत्नी जस्मा देवी यांनी एकदा आणि कुलदीप यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, INLD आणि आप या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत.
दुसरीकडे बिहार विधानसभेच्या मोकामा आणि गोपालगंज या दोन जागांवर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागांवर सत्ताधारी महाआघाडीत सहभागी असलेला राजद आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात चुरशीची शक्यता आहे. मोकामा जागा आधी आरजेडी आणि गोपालगंज भाजपच्या ताब्यात होती. भाजप प्रथमच मोकामा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, मागील निवडणुकीत त्यांनी ही जागा मित्रपक्षांसाठी सोडली होती. या जागेसाठी भाजप आणि आरजेडी या दोन्ही पक्षांनी बाहुबलीच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. मोकामामध्ये भाजपने अनंत सिंह यांना विरोध करणाऱ्या स्थानिक बाहुबली लालन सिंह यांची पत्नी सोनम देवी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून आरजेडीने अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांना उमेदवारी दिली आहे.