आसाम : आसामच्या डिब्रूगडमध्ये एक थक्क करणारी घटना घडली आहे. इथं चक्क एका नदीलाच आग लागली आहे. दुलियाजान येथील नदीतून कच्च्या तेलाची पाईपलाईन टाकण्यात आली होती. ही पाईपलाईन फुटल्यामुळे नदीच्या पाण्यावर कच्चा तेलाचा तवंग पसरला आहे. यावर आग पकडली असून गेल्या तीन दिवसांपासून ही आग सुरुच आहे. नदी आगीनं धगधगत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडची ही पाईपलाईन आहे.
आग लागल्याची माहिती स्थानिकांनी तीन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिली. मात्र जिल्हा प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान या आगीनं मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण तसंच वायू प्रदूषण होत आहे. कच्चं तेल चोरण्यासाठी काहींनी ही पाईपलाईन फोडली आणि त्यानंतर पेटवून दिली असा आरोप येथील ग्रामस्थांनी केलाय.