Owiasi Car Firing Case : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या ताफ्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलं असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. पोलीस चौकशीत आरोपींनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ल्या करण्याचा सुनियोजित कट रचला होता, असं तपासात समोर आलं आहे.
दोन्ही हल्लेखोर तरुण आधीपासूनच घटनास्थळावर उभे होते. ओवेसींचा ताफा टोल प्लाझाजवळ पोहोचताच ते जवळ आले. वाहनांचा वेग कमी होताच त्यांनी ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केला. दोघांनी कारच्या खालच्या दिशेने गोळी झाडल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. हल्ल्यासाठी ओवेसी येण्याच्या दीड तास आधी ते पोहोचले होते. ओवेसी यांचा चालक यामीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आधी वाटलं स्फोट झाला, नंतर कळलं गोळीबार झाला
घटनास्थळावरून निघाल्यावर ओवेसी यांनी एएसपींना फोन केला. त्यांना संपूर्ण घटना सांगितली. आधी जवळच स्फोट झाल्याचं त्यांना वाटलं, पण दुसरी गोळी झाडण्यात आली तेव्हा कारवर गोळीबार होत असल्याचं लक्षात आलं, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर ट्विट करुन ओवेसी यांनी घटनेची माहिती दिली.
फेसबूकवर मैत्री, फोनवरुन रचला कट
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकाच नाव सचिन तर दुसऱ्याचं नाव शुभम आहे. या दोघांची मैत्री फेसबूकवर झाली. त्यानंतर फोनवर त्यांचं बोलणं वाढत गेलं. फोनवरच दोघांनी हल्ल्याचा कट रचला. मित्रांकडून त्यांनी बंदूका घेतल्या. त्यानंतर हल्ल्याच्या दिवशी ते भेटले आणि कारने टोलनाक्यावर पोहचले.
'आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही'
पोलिस चौकशीत सचिन आणि शुभम यांनी आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचं सांगितलं. असदुद्दीन ओवेसी यांच्यापेक्षा जास्त नाराजी त्यांचे भाऊ अकबरुद्दीन यांच्यावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ओवेसी यांच्या भावाने दिलेल्या भाषणातील एक मुद्दा वादग्रस्त होता. पोलिसांना हटवा मग आम्ही दाखवून देऊ असं या भाषणात उल्लेख केला होता. या वक्तव्याचा या दोघांना राग होता. त्यानंतर खूप ते दिवसांपासून हल्ला करण्याचा विचार करत होते. त्यांचा उद्देश ओवेसींना मारण्याचा नव्हता, तर द्वेषाचे राजकारण सोडून द्या, असा संदेश देण्याचा होता. ओवेसी यांना कोणतीही इजा करण्याचा उद्देश नव्हता, त्यामुळे कारच्या खालच्या भागात गोळी झाडण्यात आली, असं हल्लेखोरांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.
जातियवादी पोस्ट करत होता सचिन
देशभक्त सचिन हिंदू या नावाने त्याचं फेसबुक प्रोफाईल आहे. सचिन अनेकदा जातीयवादी पोस्ट करत असे. भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटोही आहेत. सचिन नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही पोस्ट करतो. सचिन अविवाहित असून वडील कंपनीत मजूर म्हणून काम करतात.
सचिनने ओवेसींच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती त्याच्या गावातील बहुतेकांना नाही. मात्र, पोलिसांनी गावात येऊन त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नेल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली आहे.
AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता गोळीबार झाला. त्यांचा ताफा पिलखुवाजवळील छिजारसी टोल प्लाझावरून जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.