नवी दिल्ली: देशातील सामान्य नागरिकांना तीन वर्षांसाठी सैन्यदलात काम करता यावे, यासाठी लवकरच भारतीय लष्कराकडून प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार 'टूर ऑफ ड्युटी' या कार्यक्रमांतर्गत लष्करात सामील होऊन राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळेल. अशा प्रस्तावासंदर्भात प्रत्यक्षात चर्चा सुरु असल्याच्या वृत्ताला लष्करी प्रवक्त्यांनी दुजोरा दिला आहे.
देशातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या प्रस्तावाची आखणी केली जात आहे. सध्याच्या घडीला लष्करात सामील व्हायचे झाल्यास शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत किमान १० वर्षे काम करण्याची अट आहे. हा कालावधी कमी केल्यास देशातील तरूण लष्कराकडे आकृष्ट होतील, असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा होरा आहे. तसेच लष्कराकडून शॉर्ट सर्व्हिस कमिशनचाही फेरविचार सुरु असल्याचे समजते. सुरुवातीच्या काळात शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा कालावधी पाच वर्षांचा होता. मात्र, नंतर तो १० वर्षांपर्यंत वाढवण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय लष्करात सातत्याने मनुष्यबळाची चणचण जाणवत आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या लष्करी सेवेचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लागावा, असा लष्करी अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.