मेघालय : नव्या पशु वध कायद्यावरून मेघालयच्या 'नॉर्थ गारो हिल्स जिल्ह्यात' वाद उफाळलाय. याच कायद्याच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष बाचू मराक यांनी पक्षाचा राजीनाम दिलाय.
उल्लेखनीय म्हणजे, चार आठवड्यांपूर्वी 'वेस्ट गारो हिल्स'चे भाजप जिल्हाध्यक्ष बर्नार्डर मराक यांनीही याच मुद्द्यावरून पक्षाकडे राजीनामा सोपवला होता.
बीफ खाणं हा आमच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग असल्याचं मराक यांनी म्हटलंय. तसंच प्रत्येक वेळी 'बीफ'वरच का चर्चा होते... डुक्कर, कोंबड्या, बकरी आणि इतर पशुंवर चर्चा का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. भाजपची बेकायदेशीर विचारधारा लोकांवर जबरदस्तीनं थोपवणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
नुकतंच, मोदी सरकारनं केंद्रात तीन वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं मराक यांनी आपल्या जिल्ह्यात 'बीची' (तांदळाची बिअर) आणि बीफ पार्टीचा प्रस्ताव दिला होता... यावर त्यांच्यावर पक्षाच्या नेतृत्वानं बरीच टीका केली होती तसंच कारवाईचा इशाराही दिला होता. त्यानंतर आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केलीय.