रिलायन्स (Reliance) समूहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. आयकर विभागाने रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर 420 कोटी रुपयांच्या कथित करचुकवेगिरीप्रकरणी (tax evasion) काळा पैसा कायद्यांतर्गत खटला चालवण्याची नोटीस बजावली आहे.
हा कर स्वित्झर्लंडच्या दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी पैशाशी संबंधित आहे. विभागाने 63 वर्षीय अंबानी यांच्यावर जाणूनबुजून कर न भरल्याचा आरोप केला आहे.
अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून कर भरला नसल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. आयकर विभागाच्या आरोपानुसार, अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून परदेशातील बँक खाती आणि आर्थिक हितसंबंधांचा तपशील अधिकाऱ्यांना दिला नाही.
या आरोपांवर विभागाने अनिल अंबानी यांच्याकडून 31 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. मात्र, या मुद्द्यावर अनिल अंबानी किंवा रिलायन्स ग्रुपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या संदर्भात अंबानी यांना या महिन्याच्या सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, काळा पैसा कर कायदा 2015 च्या कलम 50 आणि 51 अंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दंडासह 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
दरम्यान, अनिल अंबानी यांच्यावर 2012-13 ते 2019-20 या आर्थिक वर्षात बेनामी संपत्ती विदेशात ठेवून चोरी केल्याचा आरोप आहे. नोटीसनुसार, अधिकार्यांना असे आढळले आहे की अंबानी हे बहामासस्थित डायमंड ट्रस्ट आणि नॉर्दर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड (NATU) मध्ये आर्थिक भागीदार तसेच फायदेशीर मालक आहेत.