सरकार योगींची पण तयारी 2024 साठी मोदींची, काय असेल यूपीत अमित शाह यांचं सरप्राईज

उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. याचा अर्थ यूपीत भाजपला आतापासून 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करायची आहे.

Updated: Mar 15, 2022, 04:46 PM IST
सरकार योगींची पण तयारी 2024 साठी मोदींची, काय असेल यूपीत अमित शाह यांचं सरप्राईज title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP election) भाजपने 273 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीचं महत्त्व सर्वच पक्षांना माहित आहे. यूपी निवडणुकीत विजयाचा अर्थ भाजपला (BJP Victory) ही माहित होता. म्हणूनच 2024 ची तयारी 2022 मध्येच सुरु झाली होती. त्यातच आता यूपी सरकार बनवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. असं म्हणता येईल.

अमित शाह (Amit Shah) आणि रघुवर दास (Raghubar Das) हे यूपीचे पर्यवेक्षक असतील. त्यामुळे अमित शाह हे 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) दृष्टीकोनातूनच मंत्रिमंडळ बनवतील यात शंका नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीत अमित शाह यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. 2017 मध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. योगी सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात भाजपला यश मिळालं. पण यामागे रणनीती ही अमित शाह यांचीच होती. 

यूपी निवडणुकीत अनेक मुद्दे होते ज्याचा वापर इतर विरोधी पक्षांनी भाजप विरोधात वापरण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर भाजपने मात केली. योगी हेच मुख्यमंत्री होतील हे जरी निश्चित असलं तरी देखील त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यायचा याचा निर्णय हे अमित शाहच घेणार आहेत. 

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या पराभवाने भाजपला धक्का बसला असला तरी त्यातून भाजप मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांची महत्त्व कमी होणार नाही याची काळजी पक्ष घेईल. ते ओबीसी नेते आहेत. पराभव झाला असला तरी त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले जावू शकते.

भाजप नेते अमित शाह काही सरप्राईज करणारे निर्णय घेऊ शकतात. काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या नेत्यांना संधी दिली जावू शकते. हे नवे चेहरे कोण असतील याची उत्सूकता यूपीच्या जनतेच्या मनात असेलच. पण 2024 मध्ये देखील याचा कसा फायदा होईल यानुसारच अमित शाह निर्णय घेऊ शकतात.

उत्तर प्रदेशातून सर्वाधिक खासदार येतात. त्यामुळे यूपीत विजय म्हणजे दिल्लीत सत्ता मिळवणं सोपं होतं. उत्तर प्रदेशातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी अमित शाह आतापासून मैदान तयार करत आहेत. फ्रंटलाईनवर खेळून संघर्ष कमी करण्य़ासाठी अमित शाह प्रयत्न करतील. जातीय समीकरण, क्षेत्रीय प्रभाव आणि विकास यावर अमित शाह हे मंत्रिमंडळ बनवतील. ज्यातून सकारात्मक संदेश देता येईल.