पणजी - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यातील सभेनंतर गोव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमित शाह यांनी राहुल गांधींनी राजकीय हेतूने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली असून ते खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी पर्रिकर यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्याचे समजले त्यावेळी चांगले वाटले परंतु या भेटीदरम्यान पर्रिकर आणि राहुल गांधी यांच्यात राफेल कराराबात चर्चा झाली असल्याचे समजले. अशाप्रकारे भेट घेऊन राहुल गांधी अतिशय खालच्या स्तरावर राजकारण करत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी खोटे बोलून पर्रिकर यांच्या तब्येतीची खिल्ली उडवली असल्याचा गंभीर आरोप शाह यांनी लावला आहे. पर्रिकर यांना भेटण्यासाठी जाऊन त्या भेटीदरम्यान अशाप्रकारे राजकीय विषयांवर चर्चा करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.