अमेठी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयावर रविवारी रात्री स्थानिक प्रशासनाकडून छापा टाकण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील मदत साहित्याची तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी काँग्रेसकडून स्थानिक भाजप खासदार स्मृती इराणी यांना लक्ष्य करण्यात आले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या छाप्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार, काही अधिकारी आणि पोलिसांचे संयुक्त पथक सुरुवातीला गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयात गेले. यानंतर या पथकाने राहुल गांधी यांच्या जनसंपर्क कार्यालयात जात तेथील मदत साहित्याची तपासणी केली. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांची चौकशी केली. यानंतर हे पथक माघारी परतले.
यानंतर विधानपरिषद सदस्य दीपक सिंह यांनी स्मृती इराणी यांच्यावर तोफ डागली. स्मृतीजी तुम्ही मोठी चूक करत आहात. स्वत: तर आपल्या मंत्रालयाकडून अमेठीला काही दिलं नाही, जर राहुल आणि प्रियांका मदत करत आहेत तर अधिकाऱ्यांकडून छापे टाकले जात आहेत. अमेठीची जनता काँग्रेससाठी कुटुंबीयांप्रमाणे आहे. हे सामान त्यांच्यासाठी असल्याचे ट्विट दीपक सिंह यांनी केले.
#अमेठी में कोरोना पर राजनीति दुर्भाग्यपूर्ण।
गौरीगंज जिला #कांग्रेस कार्यालय में बिना कारण व बिना वारंट प्रशासन छापा डालने पहुँचा।
शायद श्री #राहुल_गांधी व कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा अमेठी की जनता को दी जा रही मदद योगी सरकार को हज़म नही हुई।
राजनीति छोड़ें, मिल कर मदद करें pic.twitter.com/HCnDkQnMK8
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 19, 2020
तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही कोरोनासारख्या संकटाच्या काळात अशाप्रकारे राजकारण केले जात असल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. प्रशासनाने वॉरंट नसताना राहुल गांधी यांच्या कार्यालयावर छापा टाकला. कदाचित राहुल गांधी आणि काँग्रेसकडून अमेठीतील जनतेला केली जाणारी मदत योगी सरकारच्या पचनी पडली नसेल, असे सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.