अलाहाबाद उच्च न्यायालयाची पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती

उच्च न्यायालयाने या निवडणुकांबाबत थेट पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना विनंती केली आहे.  

Updated: Dec 23, 2021, 11:22 PM IST
अलाहाबाद उच्च न्यायालयाची  पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती title=

अलाहाबाद : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची धामधूम सुरु झाली आहे. जोर बैठका होऊन उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. अशातच उच्च न्यायालयाने या निवडणुकांबाबत थेट पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना विनंती केली आहे.

एका जामीन अर्ज प्रकरणात आदेश देताना उच्च न्यायालयाने पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांना हि विनंती केली आहे. आरोपी संजय यादवविरुद्ध प्रयागराजच्या कॅन्ट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पॊलिसांनी त्याला टोळी कायद्यांतर्गत अटक केली. त्याने केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी देताना न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठाने निवडणुकांबाबत ही विनंती केली आहे. 

देशात आणि परदेशात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या निवडणूक रॅली आणि सभा रोखण्यासाठी पंतप्रधान आणि निवडणूक आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

तिसऱ्या लाटेपासून जनतेला वाचवण्यासाठी राजकीय पक्षांकडून गर्दी जमवून निवडणूक रॅलींवर बंदी घालण्यात यावी.  राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रचार करण्यास सांगितले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पंतप्रधानांनी आणि निवडणूक आयोगाने या निवडणूक पुढे ढकलण्याचा विचार करावा. कारण जीव असेल तर जग आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.